लांजा :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लांजा तालुक्यात दाणादाण उडवली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन कोरोना रुग्णवाहिका अपुऱ्या पडत असल्याने आमदार राजन साळवी यांनी लांजा तालुक्याला रुग्णवाहिका प्रदान केली आहे. रुग्णवाहिकेची किल्ली त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मारुती कोरे यांच्या ताब्यात दिली.
लांजा तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. अशावेळी गावागावांतील कोरोना रुग्णांना लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी किंवा घरी सोडण्यासाठी रुग्णवाहिकेची गरज होती. सध्या लांजा ग्रामीण रुग्णालयाकडे केवळ एकच रुग्णवाहिका असल्याने कोरोना रुग्णांसाठी आणखी एका रुग्णवाहिकेची गरज भासत होती. त्यामुळे डॉ. मारुती कोरे यांनी आमदार साळवी यांच्याकडे रुग्णवाहिकेची मागणी केली होती.
रुग्णांसाठीची गरज लक्षात घेऊन आमदार साळवी यांनी गुरुवारी लांजा तालुका आरोग्य विभागासाठी एक नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. लांजा तहसील कार्यालयात या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पार पडला.
डॉ. मारुती कोरे यांनी आमदार साळवी यांचे विशेष आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी लांजा प्रांताधिकारी पोपट ओमासे तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, लांजा तालुकाप्रमुख संदीप दळवी, उपतालुका प्रमुख सुरेश करंबेळे, लांजाच्या सभापती मानसी अंबेकर, नगराध्यक्ष मनोहर बाईत, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, शहर सचिव प्रसाद भाई शेट्ये उपस्थित होते.