चिपळूण : दिवसेंदिवस कोरोनाचे संक्रमण वाढत असतानाच चिपळूण शहरातील पेठमाप व बहादूरशेख नाका येथे वाशिष्ठी नदीपात्रात थेट रुग्णवाहिकाच धुतल्या जात असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. या रुग्णवाहिकांचा वापर काेराेनाचे रुग्ण नेण्यासाठी केला जात असल्याने गाड्या थेट नदीत धुणे नागरिकांसाठी धाेकादायक असल्याचे म्हटले आहे.
याबाबत येथील नागरिक दीपक कदम यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. चिपळूण शहरातील पेठमाप व बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदीपात्रात नेहमीच वाहने धुतली जतात. मात्र, कोरोनाची परिस्थिती असताना येथे रुग्णवाहिका धुण्यासाठी आणल्या जातात. प्रशासनाने याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी दीपक कदम यांनी केली आहे. शहरामध्ये साधारण आठ ते दहा खासगी रुग्णवाहिका आहेत. त्याच पद्धतीने काही शासकीय रुग्णवाहिकाही असून, या खासगी रुग्णवाहिका पेठमाप व बहादूरशेख खेर्डी येथे पेपर मिलच्या मागे वाशिष्ठी नदीपात्रात धुतल्या जात आहेत. याविषयी गंभीरपणे दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
...................................
फोटो - चिपळूण शहरातील बहाद्दूरशेख नाका येथे वाशिष्ठी नदी पात्रात रुग्णवाहिका धुतल्या जाताहेत.