रत्नागिरी : टंचाईकृती आराखड्यातील १४ कोटी ४३ लाख ९५ हजार रुपये खर्च करुन दुरुस्त करण्यात येणाºया २२२ पाणी पुरवठा योजनांची कामे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडली आहेत. जिल्हा प्रशासनाकडे या कामांच्या निविदा प्रक्रियेसाठी मागणी करुनही त्याला कोणतेही उत्तर न मिळाल्याने पाणी पुरवठा योजनांची दुरुस्तीची कामे ऐन टंचाईच्या कालावधीत सुरु झालेली नाहीत.
नादुरुस्त झालेल्या पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपयांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येत असले तरी ही दुरुस्ती वेळेवर होत नाही. त्यामुळे अनेकदा योजना नादुरुस्त झाल्याने जनतेच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. ग्रामीण भागातील नळपाणी पुरवठा योजना दुरुस्त व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने यंदाच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये त्यासाठी निधीची मागणी केली होती़ जिल्हा प्रशासनाने २२२ नळपाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी ४३ लाख ९५ हजार रुपये मंजूर केले आहेत़
या योजनांचा विस्तार १५३ गावातील ३०६ वाड्यांमध्ये झालेला आहे. या योजनांच्या नादुरुस्तीचा परिणाम लाखो लोकांना करण्यात येणाºया पाणी पुरवठ्यावर होतो़ उन्हाळ्याच्या दिवसांत तर या लोकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते़ त्यासाठी या योजना टंचाई कृती आराखड्यामध्ये दुरुस्तीची कामे घेण्यात आलेल्या होत्या. या नळपाणी योजना लवकरच दुरुस्त होऊन त्याचा फायदा टंचाईच्या कालावधीत होणार होता.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने ही कामे करण्यासाठी जिल्हाधिकाºयांकडे निविदा काढून पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीची कामे सुरु करण्याची परवानगीसाठी मागितली होती. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत काहीही कळविले नाही. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई सुरु झाली असली तरी जिल्हा परिषदेकडून ही दुरुस्तीची कामे हाती घेतलेली नाहीत. त्यामुळे ही कामे अडकली आहेत.