प्रवासी शेड कामास प्रारंभ
देवरूख : दाभोळे जिल्हा परिषद गटातील मुर्शी गावात प्रवासी निवारा बांधकामाचे भूमिपूजन झाले असून शेडच्या कामकाजाला प्रारंभ झाला आहे. भाजपचे कामगार आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मंगेश चव्हाण स्वखर्चाने मार्गनिवारा बांधत आहेत. गेली ३० ते ३५ वर्षे या गावात एस.टी. येते. मात्र शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती.
पुस्तक प्रदर्शन
खेड : तालुक्यातील मोरवंडे बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालयात पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात कथा, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, कादंबरी, स्पर्धा परीक्षासंबंधी पुस्तके प्रदर्शन मांडण्यात आली होती. संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांनी प्रदर्शनाचा हेतू विषद केला.
जुनी पेन्शन योजना
रत्नागिरी : शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, अशी मागणी बिरसा क्रांती दलातर्फे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे. २००५ नंतर नोकरीला लागलेल्या सर्व विभागांतील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही.
मालमत्ता जप्त
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेतर्फे मालमत्ता ठकविणाऱ्या शहरातील ४० जणांची मालमत्ता नगर परिषदेने जप्त केली आहे. आतापर्यंत ७२ टक्के करवसुली झाली असून त्यामध्ये ७० लाख रुपयांच्या धनादेशाचा समावेश आहे. आर्थिक वर्ष समाप्तीअंतर्गत मालमत्ता करवसुली विभागातर्फे वसुली मोहीम शहरात राबविण्यात आली.
खतपुरवठा वेळेवर व्हावा
रत्नागिरी : यावर्षी अवकाळी पाऊस, वादळ यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकरी आता खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून त्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामासाठी आवश्यक बियाणे व खतपुरवठा वेळेवर व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
बशीर परकार यांची नियुक्ती
मंडणगड : महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या मंडणगड तालुकाध्यक्षपदी पेवे येथील बशीर परकार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी नजिर वलेले यांची निवड झाली आहे. परकार व वलेले यांच्या निवडीबद्दल उर्दू शिक्षकांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.