चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शहर हद्दीतील खड्ड्यांचे प्रमाण अधिक आहे. अशातच आज, गुरुवारी रक्षाबंधनसाठी एक नागरिक शहरातील बहाद्दूरशेख नाका येथून जात असताना त्याच्या अंगावर चिखल उडाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकाने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निषेधार्थ चक्क रस्त्यावरील खड्ड्यात साबण लावून शर्ट धुतला. या प्रकारची जोरदार चर्चा सुरू असून त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदीकरणाचे काम अद्याप ५० टक्केही पुर्णत्वास गेलेले नाही. धिम्या गतीने काम सुरू असल्याने तालुक्यातील नागरिकांसह लोकप्रतिनीधींची ओरड सुरू आहे. शहरासह वालोपे, कापसाळ, कामथे, सावर्डे, असुर्डे खेरशेत आदी ठिकाणी महामार्गावर खड्डे पडले आहेत. शहरात जुन महिन्यात डांबराने खड्डे भरण्यात आले होते. मात्र जोरदार पाऊस आणि रस्त्यावरील वाहतूकीमुळे हे खड्डे टिकलेले नाहीत. गेल्या काही दिवसापुर्वी आमदार शेखर निकम यांनी मतदार संघातील मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करून तत्काळ पावसाळी डांबराने खड्डे भरण्याच्या सुचना दिल्या होत्या. तर महामार्गाच्या कामामुळे कोणाच्या घरात, वसाहतीत पाणी जाण्याचे प्रकार घडत असतील तर तेथील पाण्याचा निचरा करण्याच्या सुचना राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी व ठेकेदारास दिल्या होत्या.येत्या काही दिवसात गणरायाचे आगमन होणार आहे. या कालावधीत महामार्गावरील वाहतूक वाढणार आहे. गणरायाचे आगमन सुखकर व्हावे. यासाठी महामार्गावरील खड्डे भरण्याच्या सुचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सावर्डे हद्दीत भर पावसात डांबरीकरणाने खड्डे भरण्याचे काम सुरू होते. जिथे रस्ता जास्त खराब झाला आहे. तिथे मोठे पॅचवर्क मारले जात होते. मात्र शहर हद्दीत महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. अशातच एक नागरिक गुरुवारी सकाळी रक्षाबंधनसाठी शहरातील बहाद्दूरशेख नाका येथून खेर्डीकडे जात असताना त्याच्या अंगावर चिखल उडाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकाने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निषेधार्थ चक्क रस्त्यावरील खड्ड्यात साबण लावून शर्ट धुतला. या प्रकारची जोरदार चर्चा सुरू असून त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
चिपळूणच्या संतप्त नागरिकाने महामार्गावरील खड्ड्यातच धुतला शर्ट, व्हिडिओ व्हायरल
By संदीप बांद्रे | Published: August 11, 2022 12:47 PM