अरुण आडिवरेकररत्नागिरी : कोणी घराची शोभा वाढविण्यासाठी तर कोणी हौस म्हणून घरात शोभिवंत मासे पाळले जात आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांत शहरी बाजारपेठेत रंगीबेरंगी माशांसाठी वेगळी बाजारपेठ तयार झाली आहे. या बाजारपेठेमुळे रत्नागिरी जिल्ह्यात वर्षाला कोट्यवधींची उलाढाल होत आहे. त्यातून तरुणांच्या हाताला काम मिळू लागले आहे.मासे पाळणे हा छंद गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढत आहे. मासा शांत आणि आवाज न करणारा प्राणी असल्याने तो पाळण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यासाठी बाजारात विविध प्रकारचे ‘फिशटॅन्क’ किंवा बाऊल उपलब्ध करून देणारी दालने तयार होऊ लागली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास २५ ॲक्वेरियमची दुकाने आहेत. या दुकानांमधून दिवसाला ३ ते ४ हजार रुपयांची विक्री होते. या व्यवसायातून वर्षाला सुमारे सव्वातीन कोटी इतकी उलाढाल होत आहे. रंगीबेरंगी माशांच्या दुनियेने तरुणांना रोजगाराचा एक नवा मार्ग उपलब्ध करून दिला आहे.यांना सर्वाधिक पसंती‘गोल्ड फिश’ पाळायला अनेकांना आवडतो. त्यानंतर आरवाना, फ्लोरान किंवा फ्लॉवर हॉर्न, शार्क या माशांना अधिक मागणी आहे. अलीकडे एंजल हा मासाही अधिक पाळला जातो.
माशांची जोडी ४० रुपयांपासून आहे. तर २० हजारांपर्यंत एक मासा उपलब्ध होतो. साधारणत: दीड ते सहा फुटांपर्यंत टॅन्क केला जातो. हा टॅन्क ५०० रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यंत मिळतो. मोठ्या टॅन्कसाठी कॅनस्टर फिल्टर वापरला जातो, त्याची किंमत सुमारे १० हजार इतकी आहे. ‘फिशटॅन्क’च्या सजावटीसाठी रंगीत स्टोन, ड्रायवूड, समुद्री दगड, प्लास्टिक प्लांट, जीवंत प्लांट वापरले जातात.
सकारात्मक ऊर्जा वाढतेपाण्याच्या दिशानिर्देशांमध्ये ॲक्वेरियम ठेवल्याने तेथील सकारात्मक ऊर्जा वाढते, असे सांगितले जाते. त्यामुळेही काहीजण मासे पाळतात. त्यासाठी योग्य दिशा कोणती हेही पाहिले जाते. तर कोणता मासा पाळणे चांगले याचा अभ्यास करूनही मासे पाळले जातात.
मी २० वर्ष या व्यवसायात असून, अलीकडे मासे पाळण्याचे प्रमाण वाढले आहे. रत्नागिरीत मुंबईतून मासे आणले जातात. १५ ते २० दिवसांतून एकदा पाणी बदलावे. केवळ ७० टक्केच पाणी बदलावे. -राजेश नंदकुमार पाटील, व्यावसायिक, रत्नागिरी.