रत्नागिरी :
कोकण रेल्वे मार्गावरील दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ओव्हर हेड एक्युपमेंट वायर तुटल्याने त्याचा फटका या मार्गावरील गाड्यांना बसला. शुक्रवारी मध्यरात्री १ वाजता हा प्रकार घडला. त्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक विस्कळीत झाल्याने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांना बसला. अखेर पाच तासांनी बिघाड दुरुस्त करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आले. त्यानंतर कोकणकन्या एक्स्प्रेस मार्गस्थ झाली.
कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीतपणाचा त्रास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतांना झाला. राज्याचे उद्योगमंत्री सामंत शुक्रवारी रत्नागिरी दौरा करणार होते, परंतु वाहतूक सुरळीत नसल्याने सामंत यांनी पुन्हा मुंबई गाठली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही वाहतूक विस्कळीतपणाचा फटका बसला. चंद्रशेखर बावनकुळे कोकणकन्या एक्स्प्रेसने प्रवास करत होते. कोकणकन्या गाडी जवळपास साडेतीन तास उशिराने धावत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर असून, शुक्रवारी ते रत्नागिरी जिल्ह्यात असणार आहेत.
दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर रखडली होती. परिणामी अनेक गाड्या विविध स्टेशनवर खोळंबलेल्या होत्या. बिघाड झालेली रेल्वे मार्गस्थ होऊनही कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या दोन ते साडेतीन तास उशिराने धावत आहेत. कोकणकन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, मडगांव एक्स्प्रेस अशा अनेक गाड्या उशिराने धावत आहेत.