दापोली : राज्यामध्ये तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. वरिष्ठ पातळीवर आघाडी झाली असली तरीही स्थानिक पातळीवर तीन पक्षांतील कार्यकर्त्यांची मने जुळण्यास विलंब होऊ शकतो; परंतु महाविकास आघाडी पक्षातील काही नेते आपली वैयक्तिक मते मांडून विरोधी पक्षांना आयते कोलीत देत आहेत. माजी खासदार अनंत गिते यांनी रायगडमध्ये केलेल्या वक्तव्याचा महाविकास आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
दापाेली येथील कार्यक्रमासाठी खासदार सुनील तटकरे शनिवारी आले हाेते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, सरकार टिकविण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या तीनही पक्षांकडून वरिष्ठ पातळीवर समन्वय साधला जात आहे, तसेच स्थानिकांची मते लक्षात घेऊन राज्यातील पुढील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्रित लढल्या जातात का, याबाबत विचारविनिमय सुरू आहे. त्यामुळे भविष्यात तीन पक्ष एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवू शकतात. यापूर्वी राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या युती व आघाडीच्या सरकारने स्थानिक पातळीवरच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या होत्या. त्यामुळे येऊ घातलेल्या सर्व निवडणुका लढण्यासंदर्भात अजून तरी कोणताही निर्णय झालेला नाही, असे तटकरे यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना व काँग्रेस या पक्षाला सहकार्य करीत नसल्याची टीका होत आहे; परंतु या टीकेला आपण रायगडमध्ये जाऊनच उत्तर देऊ, असे त्यांनी सांगितले.
----------------------
सीआरझेडचे पुनर्सर्वेक्षण करणार
रत्नागिरी, रायगड दोन्ही जिल्हे पर्यटन जिल्हे आहेत. पर्यटन वाडीमध्ये सीआरझेडचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. श्रीवर्धनच्या धर्तीवर दापोली, गुहागर तालुक्यातील समुद्रकिनारे विकसित केले जातील. राज्य सरकार सीआरझेडचा पुनर्सर्वेक्षण व नवीन कोस्टल मार्ग निर्माण करण्याच्या तयारीत आहे. याचा फायदा हॉटेल व्यावसायिकांना होणार आहे. सीआरझेड शिथिल करण्यासाठी गुहागरच्या पार्श्वभूमीवर दापोलीमध्ये प्रयत्न सुरू आहेत, असे तटकरे यांनी सांगितले.
-----------------------
भाजप सरकारकडून जनतेची लूट
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कारकीर्दीत डॉलरचा रेट जास्त असूनही पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर नियंत्रणात ठेवण्यात यूपीए सरकारला यश आले होते; परंतु आता डॉलरचा दर घसरला असूनही केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेल गॅसवर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला जात आहे. त्यामुळे दर गगनाला भिडले आहेत. वारंवार संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करूनसुद्धा भाजपचे सरकार जनतेची लूट करीत आहे. हे दर कमी करण्याची मानसिकता सरकारची नाही, असे तटकरे म्हणाले.