हर्षल शिराेडकर / खेड : शहराच्या मध्यवर्ती भागात संरक्षित हरितपट्टा क्षेत्रात प्राचीन, पुरातन व गरम पाण्याचे कुंड आहे. गेल्या १५ वर्षांत या पवित्र कुंडाकडे सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक व धार्मिक कार्यकर्ते यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या कुंडाला समाजकंटकानी आपला अड्डा बनवला आहे. सद्यस्थितीत या कुंडाच्या मुख्य भागात मद्याच्या बाटल्या, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा खच पडला आहे.
खेड शहराला प्राचीन, ऐतिहासिक, पौराणिक वारसा आहे. या शहरात पुरातन काळातील अनेक खुणा विविध ठिकाणी आढळतात. शहरातील खांबतळे, पुरातन लेणी, बंदर परिसर व तेथील शेकडो वर्ष जुन्या समाध्या, गरम पाण्याचे कुंड, भैरी मंदिर आदी ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर त्याची साक्ष पटते. ही सर्वच ठिकाणे दुर्लक्षित व अविकसित राहिली आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून शहरातील या ठिकाणांच्या विकासासाठी प्रयत्न सुरु आहे. स्थळे विकसित करण्यासाठी लाखो व करोडोंचे आकडे गेल्या कित्येक वर्षांपासून जाहीर होत आहेत. पण हा निधी जाताे कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खेड शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गरम पाणी कुंड क्षेत्रात प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. याठिकाणी स्वागत कमान व घाट बांधला आहे.
प्रवेशद्वाराजवळ वाढलेल्या वेली, पादचारी मार्गाच्या दुतर्फा आठ ते दहा फूट उंच वाढलेली गर्द झाडी, कुंडाच्या परिसरात एक ते दोन फूट वाढलेले गवत, कचऱ्याचा खच, पवित्र कुंडाच्या पाण्यात साचलेला गाळ, परिसरात पडलेल्या रिकाम्या मद्याच्या व पाण्याच्या बाटल्या, सिगरेटची पाकिटे असे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.
-----------------
सुशोभिकरणाचा खर्च गेला कुठे?
गेल्या २५ वर्षांत याठिकाणी सुशोभिकरणाच्या कामामध्ये लाखो रुपये खर्च झाले आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ही रक्कम कोणत्या गोष्टीवर खर्च झाली, असा प्रश्न पडतो. लाेकप्रतिनिधी, धर्माभिमानी कार्यकर्ते हे या पवित्र कुंडाकडे पाहून डोळे मिटून गप्प बसले आहेत. शहराचे ऐतिहासिक व सांस्कृतिक पवित्र स्थान असलेल्या या गरम पाण्याच्या कुंडाकडे लक्ष देऊन त्याचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.