खेड : ग्रामीण भागात वाडी-वस्तीवर जाऊन काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मे महिना सुरू झाला असला तरी, अजूनही मार्च महिन्याचे मानधन मिळालेले नाही. कोरोना काळात दुर्गम भागात जाऊन काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
रेशन देण्यास प्रारंभ
रत्नागिरी : कोरोना काळात खबरदारी घेण्याच्यादृष्टीने रेशन दुकानातून धान्याचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी न करता दुकानदारांनी आधार अधिप्रमाणित करावेत, अशा सूचना शासनाकडून करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता रेशन दुकानांवर पॉस मशीनवर अंगठा न लावता धान्य देण्यास सुरुवात केली आहे.
निधी मंजूर
लांजा : पाणीटंचाई कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी दोन कोटी ८ लाख ९ हजार ८९० रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता तालुक्यातील दुर्गम भागातील पाणीटंचाई संपुष्टात येण्यास मदत होणार आहे.
ग्राम कृती दल सक्रिय
रत्नागिरी : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशानंतर गावोगावी ग्राम कृती दल सक्रिय बनले आहे. या दलाच्या माध्यमातून आता गावामध्ये माझी रत्नागिरी - माझी जबाबदारी ही मोहीम सुरू झाली आहे. ग्राम कृती दलाचे सदस्य प्रत्येक व्यक्तीचे तापमान आणि ऑक्सिजन यांची तपासणी करीत आहेत.
चोवीस तास कर्मचारी
रत्नागिरी : ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन साठा आहे, तेथे कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता अशा ठिकाणी निगरानीसाठी २४ तास कर्मचारी कार्यरत ठेवण्यात आला आहे.
सभापतींची भेट
दापोली : कोरोनाच्या अनुषंगाने दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयाला कृषी पशुसंवर्धन सभापती रेश्मा झगडे यांनी भेट देऊन आढावा घेतला. त्यांच्यासमवेत युवा सेना तालुका अधिकारी सुमित जाधव, बांधतिवरे ग्रामपंचायतीचे सरपंच सुदेश डाकवे आदी उपस्थित होते. रेश्मा झगडे यांनी आरोग्य यंत्रणेची पाहणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
जिल्ह्यासाठी खत मंजूर
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी २० हजार २५० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आंबा, काजू आणि भातशेतीसाठी खताची मागणी करण्यात येते. मात्र यावेळी केवळ १३ हजार २७० मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आले आहे. येत्या तीन ते चार दिवसात हे खत जिल्हा कृषी कार्यालयाकडे उपलब्ध होणार आहे.
परिचारिका दाखल
रत्नागिरी : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढू लागल्याने कंत्राटी पद्धतीने पद भरती करण्यास सुरुवात केली आहे. येथील यश फाऊंडेशन आणि परकार फाऊंडेशन यांच्याकडील ९० परिचारिका जिल्हा रुग्णालयात मंगळवारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे.
खासगी बसेस उभ्याच
चिपळूण : सध्या लॉकडाऊन सुरू आहे. १५ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत खासगी बस वाहतूकदारांचा व्यवसाय थांबला आहे. सध्या या बसेस उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात या व्यवसायाला फटका बसला होता. आता कोरोनामुळेच नुकसान होत आहे.
सुशोभिकरणासाठी निधी
आवाशी : खेड तालुक्यातील जागृत देवस्थान अशी श्रद्धा असलेल्या शिवरोबा देवस्थानच्या सुशोभिकरणासाठी ७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंदिराकडे जाणारा रस्ता तयार करणे, रस्त्याचे डांबरीकरण, विद्युत पोल आदींसाठी हा निधी मंजूर केला असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.