खासगीकरण विराेधी दिवसानिमित्त अंगणवाडी कर्मचारी सभा शाखेतर्फे लांजा तहसीलदार समाधान गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
लांजा : केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व सेवा यांच्या खासगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे साेमवारी खासगीकरण विरोधी दिवस पाळण्यात आला. लांजा तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यामध्ये सहभागी हाेऊन लांजा तहसीलदार यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले.
केंद्र सरकारने गेल्या वर्षभरामध्ये शेतकरी विरोधी, कामगार विरोधी, कॉर्पोरेट धार्जिणे धोरण आक्रमकपणे राबवायला सुरुवात केली आहे. ७० वर्षांमध्ये देशातील जनतेच्या पैशांवर व श्रमावर उभ्या करण्यात आलेल्या सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे, असा आराेप संघटनेने केला आहे. पेट्रोलजन्य पदार्थ व जीवनावश्यक वस्तूंवर भरसमाट कर लावून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली जात आहे. त्यामुळेच महाराष्ट्र कर्मचारी कृती समितीच्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी, कामगार विरोधी, कॉर्पोरेट धार्जिन या धोरणाच्या विरोधात खासगीकरण विरोध दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेतर्फे लांजा तहसीलदार समाधान गायकवाड यांना निवेदन देताना अंगणवाडी कर्मचारी सभा शाखा अध्यक्षा स्वाती शेट्ये, उपाध्यक्ष स्वाती कोळवणकर, अस्मिता गुरव, सचिव श्वेताली रसाळ, मीनल राणे, मेधा कानडे, मनीषा खामकर उपस्थित होत्या.