आॅनलाईन लोकमत
देवरूख, दि. १ : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली दशक्रोशीत अवैध वृक्षतोडीला मोठ्या प्रमाणात ऊत आला आहे. मात्र, याकडे देवरूख वन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे.
आंगवलीसह बामणोली, निवधे, खडीओझरे, बोंड्ये, मुर्शी, दख्खीण आदी गावात बेसुमार जंगलतोड राजरोसपणे सुरू आहे. मात्र, या वृक्षतोडीकडे वन विभाग सोयीस्कररित्या डोळेझाक करत असल्याचा आरोप दशक्रोशीतील दक्ष ग्रामस्थांमधून केला जात आहे.
या बेसुमार वृक्षतोडीमुळे आवळा, कुडा, पांगळा, वावडींग, बेहडा, जांभूळ, पळस आदी औषधी वनस्पतींसह ऐन, किंजळ, साग, आकेशिया, मोहट, बिबळा आदी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. यामुळे वनौषधी झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ही तोड केलेली झाडे ट्रकमध्ये भरून विनापरवाना परजिल्ह्यात नेली जात असल्याचे चित्र आहे.
वन विभागाचा तपासणी नाका साखरपा येथे आहे. या नाक्यावरूनच विनापरवाना वाहतूक होत असल्याचे दिसून येते. या वाहतुकीसाठी वन अधिकारी लाकूड व्यापाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करतात, यामुळेच ही वाहतूक करणे शक्य होते, यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.
यापूर्वी साखरपा येथे वन विभागाने विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक व वाहनांवर कारवाई केली होती. या कारवाईचा विचार करता ही कारवाई म्हणजे केवळ दिखाऊपणा होता, म्हणावे लागेल. खरेतर वन विभागाने साखरपा येथील तपासणी नाका स्ट्राँग करून विनापरवाना लाकूड वाहतुक करणाऱ्यांवर धाडसत्र अवलंबणे गरजेचे आहे असे खडे बोल पर्यावरण प्रेमी व स्थानिक ग्रामस्थांमधून उमटत आहेत. (प्रतिनिधी)