पाण्याच्या एका घोटासाठी प्राण्यांची तडफड!उष्म्याची दाहकता : कुंभार्ली घाटात फिरणाऱ्या माकडांना पाण्याची आस; पाण्याविना मृत्यू होण्याची भीतीशृंगारतळी : चिपळूण - पाटण मार्गावरील कुंभार्ली घाटात पाण्याविना वन्यप्राण्याचे कमालीचे हाल होत आहेत. घाटातून ये - जा करणाऱ्या वाहनांना प्लास्टिकची बाटली दाखवून माकडे पाण्याची मागणी करत असल्याचे भयानक चित्र आहे. घाटात माकडांची वस्ती असलेल्या ठिकाणी पाण्याचा हौद बांधण्याची गरज आहे. अन्यथा पाण्याविना माकडांचा मृत्यू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.उन्हाळ्याच्या तीव्र झळा स्वत: मानवाबरोबर संबंध प्राणीमात्रालाही सहन कराव्या लागत आहेत. शहरीकरणाच्या नावाखाली जंगलांची मोठ्या प्रमाणात तोड केली जात आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. दुष्काळ व अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्ती मानव व वन्य प्राण्यावर कोसळत आहेत. यावर्षी उन्हाळा तीव्र असल्याने जंगलातील पाण्याचे प्रवाह कोरडे पडले आहेत. जंगलात कुठेही पाण्याचा थेंब दिसत नाही. त्यामुळे तहानेने व्याकूळ झालेले वन्यप्राणी पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या प्रवाशांना दाखवून त्यांच्याकडे याचना करताना दिसतात. चिपळूणनजीकच्या कुंभार्ली घाटात लाल तोंडाच्या माकडाची प्रजात आहे. घाटात एका वळणावर ही माकडे मोठ्या संख्येने जमा झालेली असतात. त्याचबरोबर घाटात वाहन उभे करण्यासाठी मोकळी जागा असल्याने अनेक पर्यटक निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी याठिकाणी उभे राहतात. त्यामुळे याठिकाणी व्ह्यू पॉर्इंट निर्माण झाला आहे. थांबलेले पर्यटक येथे वावरत असलेल्या माकडांना अन्न टाकतात आणि निघून जातात. पण त्यांना पाणी कोण देणार? पाण्याने व्याकूळ झालेली हा माकडांचा कळप कोणी तरी पाणी घेऊन येईल, याची वाट बघत राहतात. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घाटातून एक कुटूंब गुहागरकडे येत होते. अंधार पडत असल्याने कार बाजूला लावून काच पुसण्यासाठी पाण्याची बाटली बाहेर काढताच पोटाला लेकरू लटकावत डझनभर माकडे त्या कारकडे धावत आली. त्यांनी हातातील बाटली ओढून घेतली. माकडांना तहान लागल्याचे कळल्यानंतर या कुटुंबाने कारमधील सात बाटल्या व पाच लीटरचा पाण्याचा कॅन असे बारा लीटर पाणी माकडांना पाजले. आपल्याजवळचा पाणीसाठा संपल्याने घाटातून जाणाऱ्या गाड्या थांबवून या कुटुंबाने पाण्याच्या बाटल्या मागून घेतल्या व माकडांना पाणी पाजले. (वार्ताहर)पाण्याचा हौद हवा...एका वेळेची तहान भागली असली तरी उन्हाळ्याचे दोन महिने पाण्याविना कसे जातील, याची चिंता आहे. त्यामुळे सामाजिक संघटना व वनविभागाने पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे. याठिकाणी पाण्याचा हौद बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा पाण्याअभावी या माकडांचा मृत्यू होण्याची दाट भीती आहे.
पाण्याच्या एका घोटासाठी प्राण्यांची तडफड!
By admin | Published: April 22, 2016 11:35 PM