चिपळूण : व्यक्ती मनाला नम्रता शिकविणारा, भूमीशी सुसज्ज साधणारा, लक्ष्मीला प्रसन्नचित्ताने निमंत्रण देणारा, आनंद नि समृद्धीचा हा अन्नपूर्णा प्रकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने शेतीतून श्रमसंस्कार, सामाजिक प्रतिष्ठा, अर्थक्रांती घडविणारा ठरला आहे, असे गौरवोद्गार कन्साई-नेरोलॅक पेन्ट्स लि. या कंपनीचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक संतोष देशमुख यांनी काढले. निमित्त होतं मांडवखरी येथे महिला शेतकऱ्यांच्या माध्यमातून उभ्या ठाकलेल्या अन्नपूर्णा प्रकल्प क्षेत्रीय भेटीचं.
कन्साई-नेरोलॅक पेन्ट्स लि. कंपनीने चिपळूण तालुक्यातील मांडवखरी येथील श्रीकाळकीदेवी महिला शेतकरी गटाला आपल्या सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्याचा स्नेहार्द हात देऊ केला आहे. दिशान्तर संस्थेच्या साथीने या महिला शेतकऱ्यांनी सहकारातून सामुदायिक शेती, सेंद्रिय शेती उत्पादनांची दलालमुक्त विक्री व्यवस्था निर्माण करीत समूह शेतीतून चांगले उत्पादन मिळविले आहे. एवढेच नव्हेतर व्यावसायिक अळंबी उत्पादनही सुरू केले आहे. घरोघरी समृद्ध परसबाग ही संकल्पना प्रत्यक्षात साकारताना विविध फळझाडे, वनस्पती, भाजीपाला, वेलवर्गीय फळभाज्या यातून निरामय जीवनाचे सूत्र सांभाळण्यात येत आहे. विशेष म्हणजे कोरोना आपत्तीकाळात या परसबागांनी येथील प्रत्येक कुटुंबाला सेंद्रिय भाजीपाला, फळे यासोबतीने इतर खर्चासाठी वित्त तरतूदही करून दिली आहे. वैयक्तिक स्तरावर महिलांनी परसबाग व मसाले पिकातून आपल्या उत्पन्नात सातत्याने वाढ सुरूच ठेवली आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या प्राथमिक चर्चेच्या वेळी उपस्थित महिला शेतकरी ते आता प्रकल्प सक्षमपणे उभा ठाकत असतानाचा त्यांच्यातला बदल ठळकपणे दिसत असल्याचे कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितले. महिला शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम अन्नपूर्णा प्रकल्पाने केले आहे, ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान व आनंद वाटत असल्याचे कंपनीचे लोटे-आवाशी येथील मनुष्यबळ व्यवस्थापक अमोल देवकर यांनी सांगितले. दिशान्तर संस्थेचे राजेश जोष्टे, सीमा यादव, कंपनीचे नंदन सुर्वे यांची उपस्थिती होती. संस्था व गटातर्फे कंपनी अधिकारी यांना मानपत्र, सन्मानपत्र व गौरवचिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.