लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गतवर्षी १८ मार्च रोजी गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील रुग्णाच्या माध्यमातून कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाला. या मार्च महिन्यात हा एकमेव रुग्ण होता. मात्र, गेल्या वर्षभरातील रुग्णसंख्या १०,२७० पर्यंत पोहोचली आहे.
शृंगारतळीत १८ मार्च २०२० रोजी आखाती देशातून आलेली व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट होताच अख्खा जिल्हा हादरला. कोरोना जिल्ह्याच्या सीमेवर नाही तर उंबरठ्याच्या आत आल्याची जाणीव झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू झाली. कोरोनाचा संसर्ग वाढू लागताच देशभरात २२ मार्चपासून संचारबंदी लागू झाली. त्यानंतर जिल्ह्यात दुसरा रुग्ण १४ दिवसांनंतर सापडला. ३ एप्रिल रोजी एक आणि त्यानंतर चार रुग्ण सापडले. यांपैकी एकाचा ८ एप्रिलला उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुंबईतील संचारबंदीला कंटाळलेले काेकणातील चाकरमानी मे महिन्यात आपल्या गावाला मोठ्या संख्येने आले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला. जून महिन्यात स्थानिक मोठ्या प्रमाणावर बाधित होऊ लागले. कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेची दमछाक होऊ लागली. गणेशोत्सवादरम्यान ही संख्या साडेसात हजारांपर्यंत पोहोचली. १७ मार्चअखेर ही संख्या १०,२७० वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान ३७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
औषधसाठा उपलब्ध आहे का?
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. सध्या प्रत्येक महिन्याला ३५० ते ४०० पर्यंत वाढ होत आहे. पुन्हा शिमगोत्सवात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका व्यक्त होत असल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. त्या दृष्टीने पुरेसा औषधसाठा उपलब्ध करण्यात आला आहे.
कोविड सेंटर्स पुरेशी आहेत का?
जिल्ह्यात पूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालय जिल्हा काेराेना रुग्णालय म्हणून सुरू करण्यात आले होते. आता हे नाॅन-कोविड रुग्णालय झाले आहे.
रुग्णांची संख्या ऑक्टोबर महिन्यात घटल्याने रत्नागिरीत २ शासकीय व एक खासगी जिल्हा कोविड रुग्णालय, ७ डीसीएचसी आणि २ सीसीसी आहेत.
पहिला पाॅझिटिव्ह सध्या काय करतो?
रत्नागिरी जिल्ह्यात १८ मार्च २०२० रोजी पहिला कोरोना रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील होता.
काही कामानिमित्त परदेशात गेलेला हा रुग्ण बाधित झाल्याचे गावी आल्यानंतर तपासणीअंती कळले.
सध्या ही व्यक्ती आपल्या गावी कुटुंबासह राहत असून तेथील मुलांना धार्मिक शिक्षण देत आहे.