टेंभ्ये : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभेच्या सुरुवातीलाच उपस्थित सभासदांनी पंचवार्षिक निवडणूक कधी जाहीर होणार? असा प्रश्न उपस्थित केला. सध्याच्या कार्यरत संचालक मंडळाची मुदत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपली असतानाही जिल्हा उपनिबंधकांनी अद्याप निवडणूक कार्यक्रम का जाहीर केला नाही, असे अनेक प्रश्न सभासदांनी उपस्थित केले. अखेर निवडणूक कार्यक्रम लवकरात लवकर जाहीर करण्यासंदर्भातील ठराव उपनिबंधकांकडे पाठविण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतपेढीच्या प्रधान कार्यालयात पार पडली. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किरण लोहार यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. किरण लोहार यांनी सेवानिवृत्ती नंतरच्या आयुष्यासाठी आर्थिक स्थैर्य महत्त्वाचे असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. वार्षिक अहवालाच्या मुखपृष्ठावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचत्य साधून छायाचित्र छापल्याबद्दल माध्यमिक अध्यापक संघाचे अभिनंदनपर पत्र सुरुवातीला वाचण्यात आले. त्यानंतर इतिवृत्ताचे वाचन सुरु असतानाच सभासदांनी पंचवार्षिक निवडणुकीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना अध्यक्ष धोंडीराम संदे यांनी पतपेढीने मतदार याद्या ६ महिन्यांपूर्वी सहाय्यक निबंधकांकडे सादर केल्याचे सांगितले. निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे काम जिल्हा उपनिबंधक करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यानंतर लाभांश वाढीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कर्जमर्यादा वाढविण्याबाबतदेखील सकारात्मक चर्चा करण्यात आली. सभेच्या शेवटी अध्यक्ष, सर्व संचालक यांच्या कार्यकाळातील ही शेवटची सभा असल्याचे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी भारत घुले, सी. एस. पाटील, गजानन पाटणकर, इ. एस. पाटील, सागर पाटील, रामचंद्र महाडिक, बशीर मुजावर यांच्यासह अन्य सभासद उपस्थित होते. आभार संचालक सत्यवान शिंदे यांनी मानले. (वार्ताहर) संदे : प्रलंबित प्रकरणांचा परिणाम नाही माध्यमिक पतपेढीच्या घटना दुरुस्ती संदर्भात सहनिबंधक व सहकार न्यायालयात प्रलंबित प्रकरणांचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होत नसल्याचे अध्यक्ष धोंडीराम संदे यांनी स्पष्ट केले. यावर सभासदांनी निवडणुकीच्या विलंबास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला.
निवडणूक लवकर जाहीर करा!
By admin | Published: August 21, 2016 10:36 PM