खेड : तालुक्यातील आंबवली-भिंगारा येथे निर्माण झालेल्या पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केलेला असतानाच, खवटी-खालची व वरची धनगरवाडीतील ग्रामस्थांनीही टँकरच्या पाण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या असून, पाण्यासाठी तालुक्यातून दाेन अर्ज दाखल झाले आहेत.
आंबवली-भिंगारा येथे आणखी काही दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आल्याने तेथील ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आंबवली-भिंगारा येथील जलस्त्रोत आटल्याने ग्रामस्थांनी २३ मार्च रोजी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता. प्रशासनाने आंबवली-भिंगारा येथे सर्वेक्षण केले असता, आणखी काही दिवस पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. खवटी-खालची व वरची धनगरवाडी येथे यावर्षी मात्र पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याचमुळे दोन्ही वाड्यांतील ग्रामस्थांनी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. या ठिकाणी सर्वेक्षणानंतर टँकरने पाणीपुरवठ्याचा निर्णय होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीटंचाई काहीअंशी लांबणीवर पडल्याने ग्रामस्थांसह प्रशासनाला दिलासा मिळाला होता. ऐन शिमगोत्सवात पाणीटंचाईचे चटके बसण्याच्या शक्यतेने ग्रामस्थ हवालदिल झाले होते.
मात्र, आतापर्यंत केवळ दोनच गावे-वाड्यांचे टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल झाले आहेत. येत्या काही दिवसात ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.