चिपळूण : गणेशखिंड येथे रात्रीच्या वेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी चार दिवसापूर्वी जनावरांची अवैध वाहतूक करणारी गाडी पकडली होती. याप्रकरणी पोलिसांनी कोंढे फाटा येथील जनावरांच्या मालकाला शनिवारी अटक केली. ही जनावरे बेळगावला कत्तल खाण्यात नेण्यात येत होती, असे पाेलीस तपासात पुढे आले आहे़
पोलिसांनी पकडलेल्या टेम्पोत गाय-बैल अशी २१ जनावरे होती. या जनावरांची किंमत ७० हजार रुपये होती. याप्रकरणी कोंढे फाटा येथील अरुण राजाराम जाधव (३७, रा.कोंढे- चिपळूण) याला पोलिसांनी अटक केली आहे. आपण नगर परिषदेच्या लिलावातील १६ जनावरे मार्चमध्ये खरेदी केली व आपल्याकडील पाच जनावरे मिळून २१ जनावरे ७० हजार रुपयाला विकली, असे त्यांने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच सांगली व कर्नाटक येथील सहा जणांना अटक केली होती. आता गुरांचा मालक असणाऱ्या अरुण जाधवला अटक केल्यामुळे या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध पोलिसांना लागणार आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विलास पड्याळ व सहायक पोलीस फौजदार प्रकाश शिंदे अधिक तपास करीत आहेत.