दापोली : भारतीय तटरक्षक दलाकडे आयसीजीएस अग्रीम व आयसीजीएस-अचूक या दोन अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज व वेगाने मार्गाक्रमण करू शकणाऱ्या बोटी आणल्या असून, तटरक्षक दलाच्या ताफ्यात त्या दाखल झाल्या आहेत. जिल्ह्याची सागरी सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी या बोटी आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे दापोली ते मांडवा सागरी सुरक्षा प्रभावी होणार आहे.
रस्तादुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
गणपतीपुळे : सागरी महामार्गावरील आरेवारेमार्गे गणपतीपुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांतून मार्गाक्रमण करणे अवघड बनले आहे. त्यामुळे वाहनचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. वारंवार मागणी करूनही रस्तादुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
कृती आराखडा तयार
रत्नागिरी : पर्यटनाला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने कोकणातील पर्यटनासाठी नव्या धोरणांची अंमलबजावणी केली आहे. यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. लवकरच पर्यटनासंदर्भात कोकणासाठी खास संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे.
माती परीक्षण थेट शिवारात
रत्नागिरी : मृदा पत्रिकेद्वारे मातीचे आरोग्य तपासून त्याप्रमाणे पीक परिस्थिती हाताळण्यासाठी कृषी विभागातर्फे थेट शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे धडे देण्यात येणार आहेत. त्यामुळे स्वत: शेतकरीच आपल्या जमिनीची सुपीकता ओळखून त्याप्रमाणे उत्पादन घेण्यासाठी प्रशिक्षित होणार आहेत.
रस्ता दुरुस्त कधी होणार?
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी-मुचरी ते वाशी सहाणेपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करून डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. रस्ता दुरुस्त कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
हळद पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
गुहागर : तालुक्यातील आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र येथे विविध प्रात्यक्षिकांद्वारे हळद लागवड प्रशिक्षण देण्यात आले. प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर यांनी विकसित केलेल्या स्पेशल कोकण ४ या हळद पिकाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.