रत्नागिरी : भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत ४ जणांच्या गळ्यातील सोन्याच्या सुमारे अडीच लाख रुपयांच्या चेन लांबवणाऱ्या आणखी ४ जणांना शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री बीड येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली कारही जप्त करण्यात आली आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
दत्ता ज्ञानेश्वर गुंजाळ (३३), सागर आत्माराम कारके (२१), नितीन अंकुश गायकवाड (२४), रमेश शंकर जाधव (५५, सर्व रा. बीड) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यांच्या बाळू तुळशीराम जाधव (२८, मूळ रा. बीड) या साथीदाराला पोलिसांनी कणकवलीतूनच ताब्यात घेतले होते. या पाच जणांनी संगनमताने २७ ऑगस्टला रत्नागिरी येथील जन आशीर्वाद यात्रेत गर्दीचा फायदा उठवत ४ जणांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरल्या होत्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण करत आहेत.