चिपळूण : दोन ठिकाणांमधील अंतर दर्शविण्यासाठी रस्त्याच्या बाजूला बसवलेला दगड म्हणजे मैलाचा दगड म्हणजे ‘माइलस्टोन’ येथे आढळला आहे.
मराठीमध्ये एक महत्वाची खूण म्हणून मैलाचा दगड असा शब्दप्रयोग केला जातो. असाच एक मैलाचा दगड चिपळूण शहरातील पेठमाप विभागात आढळला आहे. त्याचे संवर्धन व्हावे व हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यात यावा, असे मत इतिहासप्रेमी मंदार आवले यांनी केले आहे.
चिपळूणची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. परशुराम मंदिर, करंजेश्वरी मंदिर, कालभैरव मंदिर, ऐतिहासिक किल्ले गोविंदगड, गोवळकोट बंदर, पुरातन मंदिर, वास्तू, शिल्पकला आदी आपल्याला येथे पाहायला मिळतील. चिपळूण शहरातील पेठमाप विभागात हा त्रिकोणाकृती मैलाचा दगड आवले यांना आढळला आहे. त्या दगडाच्या डाव्या बाजूला चिपळूण, तर दुसऱ्या बाजूला गोवळकोट २ असे इंग्रजीमध्ये कोरलेली अक्षरे आहेत. पेठमापमधून मुरादपूर -वाणीआळीकडे तसेच ज्या ठिकाणी श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी शेरणे काढते त्या मार्गावर हा दगड आढळून आला आहे. हा दगड आढळून आल्यानंतर मुंबई येथील चंदन विचारे हे मुंबईमध्ये सापडलेल्या ब्रिटिशकालीन मैलांच्या दगडावर अभ्यास करीत आहेत. तसेच दुबईस्थित चिपळूणमधील रहिवासी मार्तंड माजलेकर यांनाही या आधी चिपळूण शहरातील गांधी चौक येथे असाच एक मैलाचा दगड आढळला होता. त्यांना या दगडाची माहिती दिली गेली आहे.
--------------------
चिपळूण शहरातील पेठमाप विभागात ऐतिहासिक मैलाचा दगड आढळला आहे़