अडरे : चिपळूण नगर परिषदेतर्फे शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यावर उपाय म्हणून आणखी एक कोविड तपासणी केंद्र शहरातील भाजी मंडईत गाळा क्रमांक ३१ व ३२ येथे सुरू करण्यात आले आहे़
जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य प्रशासन यांच्या आदेशानुसार चिपळूण नगर परिषद नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, आरोग्य सभापती शशिकांत मोदी व सर्व सदस्य मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी एक कोविड तपासणी केंद्र चिपळूणमध्ये सुरू करण्यात आले आहे. महर्षी कर्वे भाजी मंडई येथे गाळा क्रमांक ३१, ३२ मध्ये नव्याने हे तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना मोफत कोविडची तपासणी करून मिळणार आहे. चिपळूण शहरातील पवन तलाव मैदान व भाजी मंडई असे दोन कोविड तपासणी केंद्र सुरू आहेत. या तपासणी केंद्रांवर नागरिकांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.