वीकेंड लॉकडाऊनवरून थेट लॉकडाऊनवर उडी पडल्याने सगळेच स्तंभित झालेले आहेत. एकीकडे हा लॉकडाऊन असावा की नसावा, यावर टीव्हीवर चर्चा रंगलेल्या आहेत. आम्ही मात्र या साऱ्यातून बाजूला होऊन व्हरांड्यामध्ये खुर्चीवर रेलून बसलो होतो. सकाळचा प्रहर असल्यामुळे आणि लॉकडाऊनच्या कारणाने रस्त्यावर चिटपाखरू नव्हतं. तेवढ्यात गेटमधून बंडोपंत आले आणि म्हणाले, काय लेखक महाशय, लॉकडाऊनमध्ये कंटाळा आला हो ! म्हटलं, तुमच्याजवळ गप्पा माराव्यात. तसे आम्ही लांबूनच म्हणालो, अगोदर तोंडाला मास्क लावा, मग बोला. त्यांनी विजारीच्या खिशातून थोडा फाटका मास्क काढून लावला. त्याचा रंग उडाला होता. ते समोरच्या स्टुलावर येऊन बसले. मी म्हणालो, बंडोपंत आज काय विशेष? तसे म्हणाले, काही नाही. आज बऱ्याच दिवसांनी येणे झालं. तुमच्याशी बोलावं. थोडा चहा घ्यावा आणि जावं. अशा विचाराने आलो आहे. मनात म्हणालो, आता बंडोपंत दहा वाजल्याशिवाय तरी जाणार नाहीत .
मग आमचे विषय वेगवेगळ्या बाजूने सुरू झाले. त्यांना म्हणालो, मला एक सांगा, पहिली लाट झाल्यानंतर आता दुसरी लाट आली आहे. यानंतर तिसरी लाट येणार आहे? म्हणे. याबाबत तुमचे मत काय? तसे बंडोपंत हसले आणि बारीक आवाजात म्हणाले, खरं सांगू काय? ही भानगड जरा वेगळी आहे. खरं तर कोरोनाच हा पॅटर्न आमच्या घरातून सुरू झाला असावा, असा माझा अंदाज आहे. आम्ही आश्चर्यचकीत झालो. म्हणालो, तुमच्या घरातून हा दुसरा प्रकार सुरू झाला आहे. कसा काय? बंडोपत अत्यंत खासगी सुरात म्हणाले, आमच्या सौभाग्यवती जेव्हा साडी खरेदीला जातात तेव्हा त्या नेहमी म्हणतात, याच पॅटर्नमधली दुसरी दाखवा. बहुदा कोरोनाने ते ऐकलं असावे. त्यामुळेच कोरोनाच्या याच पॅटर्न मधला दुसरा स्ट्रेन आला असावा. अर्थात, हा आमचा प्रायमरी अंदाज आहे. आम्ही तसं अजून कोठे बोललो पण नाही. बंडोपंतांच्या या शोधामुळे आम्ही पार गार पडलो. तसे बंडोपंत म्हणाले, तसं सौभाग्यवतीना यातलं काही बोललो नाही म्हणा. अहो कुठे बोलायला जावं आणि काय? आपत्ती कोसळेल ना ते सांगता येणार नाही. त्याच्यापेक्षा न बोललेलं बरं. आम्ही इतके आश्चर्यचकीत झालो की, काही कळायला मार्ग नव्हता. बंडोपंत म्हणतात तसंही असू शकेल. काय? सांगावं बुवा? तसे आम्ही म्हणालो, बंडोपंत आज तुम्ही फक्कड चहा घेऊनच जा. आम्ही नेहमीप्रमाणे स्वयंपाक घराच्या दिशेने तोंड करून म्हणालो, बंडोपंतांना एक कप चहा करा, आलं टाकून. मागच्यासारखा आतून आवाज आला नाही. व्हायलेन्ट आवाज आला नाही. तर आमच्या सौभाग्यवतीच व्हरांड्यात आल्या. कमरेवर हात ठेवून म्हणाल्या, काहो बंडोपंत भाऊजी, तुमची बायको फक्त म्हणते काय, याच पॅटर्नमध्ये दुसरी दाखवा? अहो, आम्ही सगळ्याच बायका अशा बोलतो. तुमच्या बायकोने यातला दुसरा पॅटर्न दाखवा? म्हणाल्या म्हणून कोरोनाचा दुसरा स्ट्रेन आलेला आहे? काही तरी बोलताय. तसा बंडोपंतांचा चेहरा एकदमच पडला. त्यांना काय? बोलावे कळेना. सौभाग्यवती म्हणाल्या, बंडोपंत भाऊजी, तुम्ही खूप हुशार आहात. पण, यांना काहीच कळत नाही. तुम्ही जे सांगाल ते ऐकत बसतात. स्वतःचे डोके कधी चालवतच नाहीत. मी चहा करते पिवून जा आज. तसे बंडोपंत घाईघाईने उठले नि म्हणाले, वहिनीसाहेब, आज राहू दे चहा. नंतर घेईन. ते निघाले तसा त्यांचा फोन वाजला. आम्ही म्हणालो, कोणाचा? तसे ते दबक्या आवाजात म्हणाले, आणि कोणाचा? याच पॅटर्नमधला दुसरीचा. खी खी खी......
- डॉ. गजानन पाटील