लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : सुसंस्कृत म्हणून ओळख असणाऱ्या रत्नागिरीत हळूहळू अवैध धंद्यांना ऊत येऊ लागला आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी रत्नागिरीत अनैतिक व्यवसायाचा प्रकार उघडकीला आल्यानंतर गुरूवारी रात्री आणखी एका अनैतिक व्यवसायाचे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. शहरातील नाचणे आय. टी. आय. मार्गावरील एका इमारतीत सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर धाड टाकून पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे. पाेलिसांनी पीडित मुलीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाचणे मार्गावरील आय. टी. आय.जवळील एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये मुलींना बेकायदेशीररित्या ठेवून, गिऱ्हाईक आणून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी याठिकाणी बोगस गिऱ्हाईक पाठवले. यावेळी मुलींना बेकायदेशीररित्या आणून व गिऱ्हाईक आणून अनैतिक व्यवसाय सुरू आहे, याची खात्री पोलिसांना झाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला, त्यावेळी तिथे एक पीडित मुलगी व तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेणारी व्यक्ती असे दोघेजण सापडले.
पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आपले नाव रावसाहेब जगन्नाथ माळी (वय ४२ वर्षे, रा. भेकराई नगर, बसस्टॉप शेजारी, ता. हवेली, जि. पुणे - मूळ रा. कासेगाव, ता . वाळवा, जि . सांगली) असे सांगितले. त्याने आपल्यासोबत एका स्त्री साथीदार असून, तिच्यासह स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता मुलींना बेकायदेशीररित्या आणून व गिऱ्हाईक आणून वेश्या व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना दिली.
याप्रकरणी पोलिसांनी रावसाहेब माळी व त्याची एक स्त्री साथीदार यांच्याविरुध्द शहर पोलीस स्थानकात गुन्हा करुन दाखल करुन रावसाहेब माळी याला अटक केली आहे . तसेच पीडित मुलीला महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पाेलीस निरीक्षक अनिल लाड, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक एम. एस. भोसले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.