देवरूख : शिवसेनेत दिली जाणारी पदे कर्तृत्व पाहून दिली जातात, पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून ही पदे सन्मानाने दिली जातात, आमच्या जिल्हा परिषद गटात मिळालेली पदे ही अशीच सन्मानाने व कर्तृत्त्वाने मिळाली आहेत, त्यामुळे घराणेशाहीचा प्रश्नच नाही, यापुढे संबंधितांनी बेताल आरोप करणे थांबवावे अन्यथा आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास समर्थ असल्याचा इशारा कसबा जिल्हा परिषद गटातील शिवसैनिकांनी दिला. कसब्यातील शिवसेनेच्या चार पदाधिकाऱ्यांच्या करण्यात आलेल्या हकालपट्टीच्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस सुरु असलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख प्रकाश घाणेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पर्शराम पवार, माजी सभापती बंडा महाडिक, संगमेश्वरचे शाखाप्रमुख संजय कदम यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सेनेचे पदाधिकारी चंद्रकांत जाधव, पर्शुराम पवार, सुरेश माईन, चंद्रकांत फणसे, आतीश पाटणे, अनंत शिवगण, प्रदीप बसवणकर, चंद्रकांत बाईत, सुदर्शन मोहिते, रत्नाकर सनगरे, रवींद्र मोहिते, संतोष पांचाळ, बंड्या नागवेकर, बाबू खातू आदिंनी यावेळी भूमिका मांडली. आमच्याकडे घराणेशाही नाहीच; उलट आम्हीच सर्वांनी महाडिक कुटुंबीयांवर विश्वास टाकला आहे, यामुळे येथे अन्य कुणाचा येण्याचा प्रश्नच नाही. जे कुणी आमच्या नेत्यांवर आरोप करत आहेत, त्यांची महाडिक यांच्याकडे पाहण्याचीही पात्रता नाही. आमच्या पक्षात शिस्त आणि आदेश मानला जातो, अशा बेताल आरोप करणाऱ्यांना कधी उत्तर द्यायचे, ते आम्हाला चांगलेच माहीत आहे. वेळ आली की, प्रत्येक गोष्टीची सव्याज परतफेड केली जाईल, असा इशाराही देण्यात आला. (प्रतिनिधी) सेना स्टाईलने अद्दल घडवण्याचा इशारा संगमेश्वरला शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून महाडिक यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करत आहोत. आज जे कुणी दोन-चारजण त्यांच्यावर हे आरोप करत आहेत, ते स्थापनेच्या वेळी जन्मले तरी होते का ? असा सवाल करुन वेळ आली तर त्यांना आम्ही शिवसेना स्टाईलने अद्दल घडवू, असा इशारा ज्येष्ठ शिवसैनिक पर्शुराम पवार आणि बाबू खातू यांनी दिला आहे.
सर्व आरोपांना जशास तसे उत्तर देणार
By admin | Published: August 21, 2016 10:28 PM