खेड : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खेड शहरातील शिवाजी चौक, तीनबत्ती नाका, भरणे नाका, महाड नाका परिसरात बॅरिकेटस् लावून पोलिसांनी सर्वांची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे, तर अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांची अॅन्टिजेन चाचणी करण्यात येत आहे.
रत्नागिरी व चिपळूण येथे गेल्या चार दिवसात विनाकारण फिरणाऱ्यांवर उपाय म्हणून आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने चाचणी हा उपाय शोधला आहे. त्या धर्तींवर मंगळवारपासून खेड शहर परिसरात तीनबत्ती नाका, भरणे नाका येथे विनाकारण फिरणाऱ्यांची चाचणी करण्यात येत आहे. यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसणार आहे. दुकानांसाठी प्रशासनाने वेळ निश्चित करून दिली असून, ठरवून दिलेल्या कालावधीव्यतिरिक्त ज्यांची दुकाने उघडी राहतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझर यांचा वापर, बँका, शासकीय कार्यालय तसेच अत्यावश्यक आरोग्य सुविधा देणारी औषधांची दुकाने, रुग्णालये या ठिकाणी काटेकोरपणे केला जाईल याकडेही यापुढे लक्ष ठेवले जाणार आहे.
किराणा दुकानदार यांना ग्राहकांपर्यंत घरपोच सेवा देता यावी यासाठी पालिका प्रशासनाने वाहतुकीसाठी रिक्षा व अन्य वाहनांची व्यवस्था केली आहे. त्यासाठी समाजमाध्यमातून दुकानदार व घरपोच सेवा देणारे वाहनधारक यांचे संपर्क क्रमांक प्रसारित करण्यात आले आहेत. शहरातील चौका-चौकात पोलीस तैनात करून प्रत्येकाची कसून तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करून तपासणी करण्यात येत आहे. विनाकारण कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांनी केले आहे.
....................................
दुकानांसाठी वेळेचे बंधन
अत्यावश्यक वस्तू वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्यांमध्ये किराणा माल, भाजीपाला, फळे, दूध इत्यादी वस्तू ग्राहकांना घरपोच देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत, तर २१ एप्रिलपासून भाजीपाला, दूध, चिकन, मटण, फळे आदी दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंत उघडी राहणार आहेत. यापैकी ज्यांना शक्य असेल त्यांनी ग्राहकांना घरपोच सेवा द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
khed_photo 201 खेड शहरातील तीनबत्ती नाका येथे विनाकारण फिरणाऱ्यांची पाेलिसांकडून चाैकशी करण्यात येत आहे.
khed_photo 202 खेड शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची अॅन्टिजेन करण्यात येत आहे.