रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळामार्फत राबविण्यात येत असलेले प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता इच्छुक संस्था, व्यवस्थापनांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज विलंब शुल्कासह दि. १५ एप्रिलपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मान्यता मिळण्याबाबत कार्यपद्धती, नियमावली, अटी व शर्ती तसेच विविध व्यवसाय अभ्यासक्रम व विविध शुल्कांबाबतची माहिती मंडळाच्या माहिती पुस्तिकेत उपलब्ध करण्यात आली आहे. अर्ज व माहिती पुस्तिका महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ, वांद्रे, मुंबई यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक नोंदणीकृत संस्था, व्यवस्थापन यांनी ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंट काढून परिपूर्ण माहिती भरलेला अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे, चलन संबंधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाकडे विहीत मुदतीत जमा करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.