रत्नागिरी : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१’अंतर्गत या वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रत्नागिरी जिल्हा ‘स्वच्छता सर्वेक्षण २०२१’मध्ये अव्वल क्रमांकावर राहील, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव व मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे.
शेती झाली दुर्मीळ
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील तिळाची शेती आता दुर्मीळ होत चालली असून, गुणौषधी म्हणून उपयोगात असलेल्या या शेतीची जोपासना करण्याची गरज निर्माण झाली आहे. सपाट भागावर हमखास पीक देणारी म्हणून तिळाच्या शेतीकडे बघितले जाते. शेतकरी पूर्वी भातशेती व नाचणीच्या शेतीबरोबर तिळाची शेती करीत असे. तिळाच्या शेतीतून मिळणारे तीळ घाण्यावर दळून त्याच्यातून तेल काढले जात असे; पण सध्या ही शेती दुर्मीळ होत चालली आहे. शेतीचे जतन नाही केले तर काळाच्या ओघात ती नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे.
उत्पन्न वाढले
राजापूर : गणेशोत्सवाला येण्यासाठी व त्यानंतर गावावरून परतीचा प्रवास करणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांसाठी राजापूर आगारातून यावर्षी १३५ गाड्या धावल्या. त्यातून आगाराला सुमारे ६ लाख ५० हजारांचे उत्पन्न मिळाले. कमी भारमान व अन्य विविध कारणांसह कोरोनातील लाॅकडाऊनमुळे एस. टी. विभाग तोट्यात असताना या उत्पन्नामुळे एस.टी.ला चांगला फायदा झाला आहे.
संचालकपदी रिसबूड
दापोली : दापोली ग्रामीण पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी संजय रिसबूड यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत शिंदे, उपाध्यक्ष सचिन मालू, बिलाल रखांगे व अन्य संचालक मंडळांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.