मूर्तीशाळेत लगबग
रत्नागिरी : जिल्ह्यातील गणेशमूर्ती कारखान्यांमध्ये मूर्ती रेखाटण्याचे काम सुरू असून, कामाची लगबग वाढली आहे. गणेशोत्सवाला दोन महिन्यांचा अवधी असून, मूर्ती रेखाटण्याचे काम सुरू आहे. भाविकांच्या आवडीनुसार विविध रूपातील गणेशमूर्ती साकारण्यात येत आहेत.
केळ्यांचा खप
रत्नागिरी : आषाढी एकादशी तसेच बकरी ईद दोन्ही सण एकत्रित आल्याने दोन्ही धर्मियांमधून भाविक उपवास ठेवत असल्याने केळ्यांना विशेष मागणी होती. आषाढी एकादशीसह मुस्लिम भाविकांचा आरफतचा रोजा असल्याने केळी व फळांचा खप चांगला झाला. ४० ते ५० रुपये डझन दराने केळी विक्री सुरू होती.
रस्त्याची दुरवस्था
रत्नागिरी : सागरी महामार्गावरील आरे-वारे ते गणपतीपुळे तसेच मधल्या नेवरे मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी प्रचिती येत आहे. शिवाय पावसाचे पाणी रस्त्यावर साचले असून, पाण्याच्या प्रवाहाबरोबर माती आल्याने रस्ते निसरडे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
विद्यार्थी अभ्यासात मग्न
रत्नागिरी : दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला असला, तरी निकालाचा आनंद घेण्याऐवजी विद्यार्थी सीईटी परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासात मग्न आहेत. प्रवेशासाठीच सीईटी परीक्षा द्यावी लागणार असून, त्यासाठीच अर्ज महाविद्यालयात उपलब्ध झाले आहेत. जुलैअखेर परीक्षा होणार आहेत.