राजापूर : स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रामाणिक काम करणाऱ्या महावितरणच्या रूपेश महाडिक यांचा आमदार राजन साळवी यांनी विशेष गाैरव केला. राजन साळवी यांनी राजापूरच्या महावितरण कार्यालयाला भेट देऊन त्यांचे काैतुक केले.
राजापूर तालुक्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राजापूर शहरासह अनेक ठिकाणी पूर आला होता. तालुक्यातील मोसम या गावातही पूर आला होता. तेथून पुढच्या काही गावांमध्ये वीजवाहिनी सदोष होती. त्यामुळे वीज खंडित करून काम सुरू होते. मात्र सोमवारी काम पूर्ण होईपर्यंत मोसम गावात पूर आला. जेथे पुरवठा सुरू करण्याचा खटका आहे, त्या बनवाडीतील खांबानजीक काही फूट पाणी वर चढले होते. मात्र, तेथील खटका सुरू झाला नाही तर पुढची गावे अंधारातच राहणार हाेती. त्यामुळे महावितरणच्या केळवली विभागात काम करणारे रूपेश महाडिक व दर्शन जोगले या दोघांनी धाडस केले. रूपेश महाडिक हे छातीपर्यंतच्या पाण्यातून खांबापर्यंत गेले आणि खटका सुरू करुन पुढची गावे प्रकाशमान केली.
त्यांच्या या कामाची दखल आमदार राजन साळवी यांनी घेतली. त्यांनी मंगळवारी महावितरणच्या कार्यालयाला भेट देऊन रूपेश महाडिक यांचा गाैरव केला. माजी सभापती सुभाष गुरव, एस. व्ही. बंडगर, कनिष्ठ अभियंता महेश हिरगुडे, सहाय्यक अभियंता योगेश ठाकरे, सहाय्यक अभियंता कांबळे, टी. जी. कदम, अमोल जगताप व कर्मचारी उपस्थित होते.
-----------------------
स्वत:चा जीव धाेक्यात घालून वीजपुरवठा सुरळीत करणाऱ्या राजापूर येथील महावितरणच्या रूपेश महाडिक यांचा आमदार राजन साळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.