रत्नागिरी : जिल्हा कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांची हिंगोली येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी सुनंदा कुऱ्हाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. याआधी त्या कोल्हापूर येथे त्या कार्यरत होत्या. सुनंदा कुऱ्हाडे यांच्याकडूनही शेतकरी केंद्रित कामाची अपेक्षा केली जात आहे.
वार्षिक सभा
वाटूळ : राजापूर तालुक्यातील ओणी परिसर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित ओणी या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आयाेजित करण्यात आली आहे. ही सभा ओणीतील गजानन मंगल कार्यालय येथे हाेणार आहे. या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
वाहनधारकांची कसरत
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर पडलेले खड्डे अधूनमधून खडीने भरले असले तरी ती खडीच पुन्हा उखडल्याने महामार्गावर सर्वत्र खडीचे साम्राज्य पसरले आहे. एकीकडे रस्त्यावर पडलेले खड्डे, तर दुसरीकडे पसरलेली खडी यावरून ये-जा करताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
पतसंस्थेची सभा
राजापूर : तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्यादित राजापूरची २७ वी सर्वसाधारण सभा २६ सप्टेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर यांनी दिली. ऑनलाईन सभेला सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेचा शुभारंभ
दापोली : दापोली तालुक्यातील अडखळ ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये १५ व्या वित्त आयोगांतर्गत कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत गोकुळ शिरगाव नारीशक्ती सोशल फाऊंडेशन व अडखळ ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ३५ महिलांसाठी शिवण क्लास सुरू करण्यात आले आहेत.
नेत्र शिबिराचे आयोजन
दापोली: दापोली येथील राजीव गांधी सुपर स्पेशालिस्ट हाॅस्पिटलतर्फे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे ९ व १० ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ९ ऑक्टोबर रोजी नेत्र तपासणी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत, तर १० ऑक्टोबर रोजी शस्त्रक्रिया तपासणी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या वेळेत असणार आहे.
संदीप उतेकर जिल्हा उपाध्यक्षपदी
खेड: तालुक्यातील कुरवळ गावचे सुपुत्र संदीप उतेकर यांची राष्ट्रवादी कामगार सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश मोरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
माहेर संस्थेमध्ये लसीकरण
रत्नागिरी : हातखंबा व कारवांचीवाडी येथील माहेर संस्थेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरणाचे आयोजन आरोग्य खात्याकडून करण्यात आले. हातखंबा येथील ३४ महिलांना तर कारवांचीवाडी येथील ३८ पुरुषांना लस देण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून याचे आयोजन करण्यात आले होते.