रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण भटक्या विमुक्त जाती जमाती आघाडीच्या जिल्हा संयोजकपदी अॅड. नीलेश आखाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी पत्र देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. सर्वांना संघटित करून संघटना उभारणीबरोबरच विकास प्रक्रिया सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे आखाडे यांनी सांगितले.
वीजपुरवठा पूर्ववत करावा
रत्नागिरी : शहरातील किल्ले रत्नदुर्ग येथे जाणारा प्रमुख रस्ता श्रीराम मंदिर ते श्री हनुमानवाडी स्टॉपदरम्यान रहदारी मार्गावर एक जीर्ण झाड मोडून पडले होते. यामध्ये विजेचे दोन खांब निकामी झाले. यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला असून, ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमाकांत आयरे यांनी केली आहे.
पर्यावरण संवर्धन
रत्नागिरी : तालुक्यातील चाफे येथील मोहिनी मुरारी कला व वाणिज्य महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पर्यावरण विभागातर्फे पर्यावरणातील बदल, वाढत जाणारे तापमान यांचा विचार करून नारळ, सुपारी रोपांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांना खाद्यान्न म्हणून सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प उभारला आहे.
शिमगोत्सव साधेपणाने
रत्नागिरी : जांभारी गावचा शिमगोत्सव कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. ग्रामदैवत श्री भैरीची पालखी शिमगोत्सवात येते. मात्र यावेळी पालखी मांडावर पाडव्यापर्यंत ठेवण्यात येणार असून भाविकांनी गर्दी न करता दर्शनासाठी उपस्थित राहावे, असे सूचित केले आहे.
अधिकाऱ्यांची निवड
रत्नागिरी : आगामी शिमगोत्सव व रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर चार पोलीस अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या पोलीस स्थानकात तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. चारही अधिकाऱ्यांना तात्काळ नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. प्रभारी अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रिपोर्ट करून पूर्तता अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
पालखी गावातच
दापोली : तालुक्यातील वागवे, कळंबट, सारंग यांच्यासह अनेक गावांच्या पालख्या इतर गावांमध्ये भेटीसाठी जातात. मात्र यावर्षी या पालख्या गावाबाहेर न नेण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे पालख्या वेस ओलांडून वेशीवरूनच मागे फिरणार आहेत व आपल्याच गावात राहणार आहे. त्यामुळे पालखी भेटीचा सोहळा यावर्षी रंगणार नाही.
गतिरोधक बसवावा
राजापूर : राजापूर धारतळे मार्गे नाटे रत्नागिरी मार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी वाहनचालक व ग्रामस्थांमधून होत आहे. या मार्गावरील अपघातांची संख्या वाढल्यानेच गतिरोधकांची मागणी जोर धरू लागली आहे. वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने अपघात वाढत आहेत.
आज वर्धापन दिन
गुहागर : तालुका अपंग पुनर्वसन संस्थेला दिनांक २५ मार्च रोजी १९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने वरवेली येथील संस्थेच्या कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये श्री सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, हळदी-कुंकू आदी कार्यक्रम होणार आहेत.