खेड : तालुक्यातील पाणीटंचाई तीव्रता कमी करण्यासाठी २१३ वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. यामुळे पाणीटंचाई काही अंशी लांबणीवर पडली. यापाठोपाठ तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी ३१ विंधन विहिरींना मंजुरी मिळाली आहे. यामुळे ३७ वाड्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
तालुक्यात वर्षानुवर्षे भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. या पाणीटंचाईचा निपटारा करण्यासाठी आमदार योगेश कदम यांनी वनराई बंधारे बांधण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार २१३ वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. पाणीप्रश्न सोडविण्यासाठी विंधन विहिरींना मंजुरी देण्यासाठी पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे, उपसभापती जीवन आंब्रे, गटविकास अधिकारी गुरुनाथ पारसे यांनी आमदार भास्कर जाधव, आमदार योगेश कदम यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार दापोली विधानसभा मतदारसंघातील कशेडी - बंगला, बारटोक, चिंचघर - दस्तुरी, मौजे जैतापूर - वाडकरवाडी, कासारवाडी, देवघर - देवघरवाडी, निळवणे - कदमवाडी, मांडवे - बेलदारवाडी, सुतारवाडी, कोसमवाडी, शिरवली - सुतारवाडी, आंबये - बौद्धवाडी, शिंगरी - फौजदारवाडी, खवटी - मंडलिक कोंड, धामणी - दंडवाडी, बौद्धवाडी, कुळवंडी - शिंदेवाडी, दहीवली - फणसवाडी, पोयनार - अलाटीवाडी, रामवाडी आदी ठिकाणी विंधन विहिरी मंजूर झाल्या आहेत. गुहागर विधानसभा मतदारसंघातील आंबडस गावठाण वरचीवाडी, मुसाड - खानविलकरवाडी, पोसरे - बुद्रूक - गावठाण, धामणंद गावठाण, वावे - गणेशनगर, काडवली - काजवेवाडी, कुंभवली - गावठाण, कर्जी, आमशेत, चोरवणे - जंगेवाडी आदी ठिकाणी विंधन विहिरी मंजूर आहेत. यामुळे या भागातील पाणी समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहेत.