दापोली : रत्नागिरी जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ क वर्ग पर्यटन विकास कामांतर्गत मुरूड येथील प्रस्तावित कामांना निधीसह मंजुरी देण्यात आली आहे. रस्ता डांबरीकरण करणे, नळपाणी योजनेसाठी साठवण टाकी, गटार बांधण्याची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
विनामास्क लोकांवर कारवाई
खेड : बेदरकारपणे वाहने चालवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसह विनामास्क फिरणाऱ्यांवर येथील पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
अध्यक्षांचा सत्कार
चिपळूण : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद निवृत्त कर्मचारी सेवा समितीच्या येथील पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रम जाधव यांची भेट घेऊन अध्यक्षांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडून समस्या सोडविण्याची विनंती यावेळी केली.
ऑनलाईन योग शिबिर
रत्नागिरी : स्वामी रामदेव प्रणित पतंजली महिला योग समितीतर्फे (कोकण) दि. १७ मार्चपासून पाचवे ऑनलाईन योग शिक्षण शिबिर सुरू झाले आहे. हे शिबिर दि. ५ एप्रिलपर्यंत चालणार आहे. कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी तसेच आरोग्यक्षमता वाढविण्यासाठी प्राणायाम गरजेचा आहे. प्राणायाम व योग याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
मल्लविद्येचा प्रसार
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाची सभा नुकतीच येथील शिक्षक पतपेढी सभागृहात झाली. जिल्ह्यात मल्लविद्येचा प्रसार व प्रचार व्हावा, रांगडे मल्ल निर्माण व्हावेत, असा निर्धार महासंघाच्या सभेत करण्यात आला.
बस फेरीची मागणी
देवरुख : देवरुख आगारातर्फे करजुवे-चिपळूण ही सकाळी सव्वाआठ वाजता सुटणारी गाडी बंद केल्यामुळे खाडी भागातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. सकाळच्या बसने चिपळूण येथे जाऊन औषधोपचार किंवा अन्य कामे करून दुपारी सव्वा वाजताच्या बसने माघारी फिरता येत होते. त्यामुळे तत्काळ ही बस सुरू करण्याची मागणी होत आहे.
शेतीसाहित्य वाटप
रत्नागिरी : प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्येतर्फे केंद्र सरकार पुरस्कृत अखिल भारतीय समन्वित ताडमाड संशोधन प्रकल्पांतर्गत अनुसूचित जाती उपप्रकल्प योजनेमध्ये जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना शेतीउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
पुलाची दुरवस्था
आरवली : धामणी बडदवाडीला जोडणाऱ्या पुलाची वापराअभावी दुरवस्था होत आहे. धामणीतील विविध गावांना जोडण्यासाठी धामणी बडदवाडी पुलाचे काम करण्यात आले आहे. गोळवली व धामणी येथे नवीन पूल उभारण्यात आल्याने हा पूल वापराअभावी तसाच पडून राहिला आहे.
स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ
रत्नागिरी : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एस.टी. महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेला दि. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सुरुवातीला दि. ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आजचा पालखी सोहळा रद्द
रत्नागिरी : शहरानजीकच्या टाकळेवाडी येथे दि. १ एप्रिल रोजी होणारा श्री देव लक्ष्मीकेशवचा पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे पालन करण्यात येणार असून, ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.