शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा वितरण आराखड्याच्या शासन मंजुरीसाठी शहर विकास आराखड्याची आवश्यकता आहे. अशा शहर विकास आराखड्याला मंजुरी देण्यासह जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून निधी मंजूर झालेल्या विविध विकासकामांना नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या नगरपालिकेच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.
यावेळी उपनगराध्यक्ष सुलतान ठाकूर, विरोधी गटनेते विनय गुरव, मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांच्यासह नगरसेवक आणि विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
नाथ पै सभागृहामध्ये झालेल्या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. शहराच्या उंच-सखल भौगोलिक स्थितीमुळे शहराच्या काही भागांमध्ये कमी दाबामुळे पाणीपुरवठा होतो. अनेकवेळा पाणीपुरवठा व्यवस्था विस्कळीत होते. पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा रस्ता खोदाई करावी लागते. यावर मात करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यासाठी शहर विकास आराखड्याची आवश्यकता असते. त्यादृष्टीने शहर विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय सभेमध्ये घेण्यात आला.
जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून निधी मंजूर झालेल्या विकासकामांची पुढील प्रशासकीय तयारी करण्याच्या अनुषंगाने मंजुरी देण्यात आली. पुंडलिक मंदिर ते शिवाजीपथपर्यंत पाइप टाकून रस्ता व सुशोभीकरण करणे आणि मंदिर मजबुतीकरण करणे, गणेश विसर्जन घाट सुशोभीकरण, भटाळी रस्ता मजबुतीकरण, रुंदीकरण आणि डांबरीकरण, जुने ग्रामीण रुग्णालय येथील जागा भूसंपादन करण्याकामी अनुदान उपलब्ध करणे, महापुरुष घुमटी ते मोठा पूल रस्ता मजबुतीकरण करणे, ओगलेवाडी, दिवटेवाडी-गुजराळी भागातील खंडेपार येथे रस्ता करून गणेशघाट बांधणे, रानतळे पाणीपुरवठा नवीन लाइन टाकणे, प्रभाग-८ मधील कोठारकर घर ते शंकर ओगले घरापासून मनोज करंबेळकर घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग-५ मधील महेश कारेकर घर ते इक्बाल गांगू घरापर्यंत रस्त्याला पेव्हरब्लॉक बसविणे, विद्याधर कुवेस्कर घर ते मारुती मंदिरपर्यंत रस्ता रुंदीकरणासाठी आर.सी.सी. संरक्षक भिंत बांधणे, अकबर ठाकूर घर ते शिवाजी पथ रस्त्याला पेव्हरब्लॉक बसविणे आदी कामांचा समावेश आहे.