लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे दांडेआडोम येथे घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. नगरपरिषदेच्या मालकीची दांडेआडोम येथे २.४६ हेक्टर जागा आहे. शहराचे विस्तारीकरण व कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी सुरुवातीला ४ कोटी ५१ लाख ६६ हजाराचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये बदल करीत सुधारित आठ कोटी आठ लाख २८ हजाराचा आराखडा तयार करून मंजूर करण्यात आला आहे.
शहरामध्ये असलेला जुना प्रकल्प ज्या परिसरात प्रस्तावित होता, तो सर्व परिसर गर्दीच्या परिसरात आहे. परिणामी कचरा संकलनामुळे निर्माण होणारी दुर्गंधी याचा नगारिकांना त्रास होण्याची शक्यता असल्याने दांडेआडोम येथील नगरपरिषद मालकीच्या २.४६ हेक्टर जागेत घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जागेची उपलब्ध झाली आहे. जागा मोठी आहे. शिवाय भविष्यातील कचरा समस्या व गरज विचारात घेता, आरोग्य सभापती नीमेश नायर यांनी प्रकल्पाचा विस्तार वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आल्यानंतर तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. मंजुरीनंतर प्रशाकीय मान्यता घेण्यात येणार आहे. घनकचरा प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न होता. जुना घनकचरा प्रकल्प नगर परिषद हद्दीतील मत्स्य उद्योग वसाहत, मंगळवार आठवडा बाजार, नगर परिषद आवारात व लघुउद्योग परिसरात प्रस्तावित होता. प्रस्तावित प्रकल्पातील आवश्यक असणारी यंत्रणा, घंटागाड्या यापूर्वीच खरेदी केल्या आहेत. या सर्व तयारीसाठी चार कोटी ५१ लाख ६६ हजार रुपयांची तरतूद होती. यापैकी २ कोटी ९६ लाख ३६ हजार रुपये इतका निधी अखर्चित आहे.
शहरातील जागेसाठी घनकचरा व्यवस्थापन जिल्हा समितीची मंजुरी घेणे आवश्यक होते. सुधारित आराखडयाला तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर कामाच्या निविदा काढल्या जाणार आहेत.