गुहागर : शृंगारतळी बाजारपेठेत ३ रिक्षा थांबे मंजूर करण्यात आले आहेत. यासाठी चालक - मालक संघटनेने आमदार भास्कर जाधव यांच्याकडे मागणी केली होती. यावेळी माजी सभापती सुनील पवार, सरपंच संजय पवार, अमरनाथ मोहिते, शहरप्रमुख नरेश पवार, सत्यप्रकाश चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य रियाज ठाकूर, रिक्षा युनियनचे अध्यक्ष महेश कोळवणकर उपस्थित होते.
चिपळूण पोलिसांचे कौतुक
चिपळूण : कोकण परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांनी मंगळवारी चिपळूण पोलीस स्थानकात भेट दिली. यावेळी काही दिवसांपूर्वी येथे घडलेल्या गंभीर गुन्ह्याच्या केलेल्या यशस्वी तपासाबद्दल पोलिसांचे विशेष कौतुक केले. उपमहानिरीक्षक मोहिते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, उपविभागीय अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्याकडून कामकाजाचा आढावा घेतला.
मच्छिमारांचे प्राधान्याने लसीकरण करणार
आबलोली : महिनाभरानंतर मच्छिमारीचा हंगाम सुरू होणार असून, मासेमारीसाठी समुद्रात जाणारे मच्छीमार बांधव दोन - चार महिने परत येत नाहीत. यामुळे कोरोना आपत्ती काळात मच्छिमारांना लसीकरणासाठी प्राधान्यक्रम देण्याबाबत जिल्हा परिषद सभेत चर्चा करण्यात आली. याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती पडवेचे जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर यांनी दिली.
बीएसएनएलची सेवा कोलमडली
दापोली : दापोलीत बीएसएनएलची इंटरनेट सुविधा कोलमडल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दापोलीत गेली अनेक वर्षे बीएसएनएलच्या सेवेवर ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत. यामुळे कामे होत नाहीतच शिवाय आर्थिक नुकसान होत आहे. काही ग्रामीण भागामध्ये दुसऱ्या कंपनीची सेवा नाही. बीएसएनएलने सेवेत सुधारणा करण्याची मागणी होत आहे.
मुरुड रस्त्यावर पुन्हा खड्डे
दापोली : तालुक्यातील आसूदकडून मुरुडकडे जाणाऱ्या रस्त्याला पुन्हा मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत . यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग खड्डेमय झाल्याने वाहनचालकांतून ओरड झाल्यानंतर मार्गावरील खड्डे आसूद ग्रामपंचायतीकडून काही दिवसांपूर्वी बुजविण्यात आले होते. मात्र, आता या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले आहेत.
कोंडमळ्यात कृषी दिन उत्साहात
चिपळूण : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त तालुक्यातील कोंडमळा येथे कृषीदिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने फळबागासह वृक्ष लागवड तसेच भात लावणी कार्यक्रम घेण्यात आले. या उपक्रमांना ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यावेळी सभापती रिया कांबळे, माजी सभापती पूजा निकम, सरपंच रमेश म्हादे, तालुका कृषी अधिकारी राहुल आडके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
आबलोलीत रोगप्रतिकारक औषधांचे वाटप
आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली ग्रामपंचायतीत नितीन कारेकर यांनी दिलेल्या रोगप्रतिकारक औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच तुकाराम पागडे, पोलीस पाटील महेश भाटकर, ग्रामसेवक बी. बी. सूर्यवंशी, तलाठी आनंद काजरोळकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमेय आर्यमाने, आशिष भोसले, मीनल कदम, साक्षी रेपाळ, पूजा कारेकर, आदी उपस्थित होते.
चिपळुणात तीन व्यावसायिकांवर गुन्हे
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सोमवारी तिघा व्यावसायिकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महेश मोहन महाडिक (कळंबस्ते), वैभव वासुदेव गवाणकर (मार्कंडी), अभिषेक कांता शर्मा (विरेश्वर कॉलनी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद पोलीस प्रीतम शिंदे यांनी दिली आहे.
खेडमध्ये दोघांवर गुन्हे
खेड : जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांचा सायंकाळी ४ नंतर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश असतानाही दोघा व्यापाऱ्यांनी दुकाने खुली ठेवल्याने येथील पोलीस स्थानकात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबुराव रायका व गणेश शिर्के अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यावसायिकांची नावे आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार अस्मिता साळवी, संदीप कदम करत आहेत.
पत्रकारांना रेनकोटचे वाटप
मंडणगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका शाखेच्यावतीने सोमवारी तालुक्यातील पत्रकारांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. पत्रकार संघाच्या कुणबी भवनातील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी तालुकाध्यक्ष महेश कंचावडे, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष नवज्योत गौड, सुरज मुढे, रोशन म्हाब्दी, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रशांत सुर्वे, विजय जोशी, सचिन माळी, विजय पवार उपस्थित होते.