पाचल : अर्जुना मध्यम प्रकल्पामुळे राजापूर तालुक्यातील करक व पांगरी खुर्द गावांचे पुनर्वसन करण्यात आले. करक गावातील लोकांना करक गावाच्या पायथ्याशी जागा देऊन पांगरी खुर्द गावाचे पुनर्वसन पाचल गावात अर्धे, तर उर्वरित पांगरी गावाच्या माथ्याशी असे करण्यात आले. राज्यमार्ग १५० व अणुस्कुरा घाटाच्या मध्यावर झालेल्या पुनर्वसनातील लोकांचा पिण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे भरपावसातही या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.राजापूर तालुक्याचा कायापालट करणारा प्रकल्प म्हणून ज्या प्रकल्पाकडे पाहिले जाते तो अर्जुना प्रकल्प पूर्णत्त्वाच्या मार्गावर आहे. ज्या गावाने आपल्या जमिनी दान करुन तालुक्याची तहान भागवण्यासाठी स्वत:चे पुनर्वसित झाले. त्या लोकांना आजघडीला पुनर्वसनस्थळी भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत. पिण्याच्या पाण्याची समस्या अजूनही संपलेली नाही. पाटबंधारे खात्यामार्फत सुरुवातीला धरणाच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीवरुन सुमारे ५ किलोमीटरची पाईपलाईन तयार करुन पाणी पुरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ही नळपाणी योजना राबवताना पुनर्वसितांच्या पदरी निराशा आल्याने ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.पाटबंधारे खात्याला पांगरी गावाचा पाणी प्रश्न डोकेदुखी ठरत असताना पुन्हा एकदा नवीन प्रयत्न केला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अणुस्कुरा गावातून सुमारे ७ किलोमीटर अंतर पार करुन या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. परंतु एका म्हणीप्रमाणे ‘नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न’ अशी काहीशी स्थिती पांगरी गावच्या नळपाणी पुरवठा योजनेत होत आहे. अणुस्कुरा गावातून येणाऱ्या पाईपलाईनला वनजमिनीमुळे दिरंगाई होत आहे. पाईपलाईन समोर दिसते. पण, लाईनमधून पाणी येत नाही. जुने पाईप सडून जात आहेत. त्याचीच पुनरावृत्ती या नवीन पाईपलाईनची होणार का, असा प्रश्न केला जात आहे. तालुक्याच्या सोयीसाठी आम्ही आमचे सर्वस्व हरवून पुनर्वसित झालो. परंतु पिण्याच्या पाण्यासाठी आमची धडपड असताना मदतीला कुणी नाही, अशी भावना पांगरीवासीय व्यक्त करत आहेत. (वार्ताहर)
अर्जुना धरण प्रकल्पग्रस्तांचे घसे अजून कोरडेच
By admin | Published: July 16, 2014 10:35 PM