रत्नागिरी : अनेक वर्षे पडून असलेली स्टरलाईट कंपनीची जागा महाराष्ट्राच्या उद्योग विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आता या ५०० एकर जागेपैकी २०० एकर जागा भारतीय संरक्षण दलाकडे वर्ग करून तेथे संरक्षण दलाचा शस्त्रास्त्र उत्पादनाचा मोठा कारखाना सुरू होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
रत्नागिरीतून पळवून लावण्यात आलेल्या स्टरलाईट कंपनीची सुमारे ३० वर्षे पडून असलेली जागा उद्योग खात्याकडे परत मिळवण्यासाठी मंत्री सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. आता त्याला यश आले आहे.शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील औद्योगिक वसाहतीमध्ये १९९१/९२ साली स्टरलाईट कंपनीला ५०० एकर जागा देण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प प्रदूषणकारी असल्याचा आक्षेप घेत त्याविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले होते. त्यामुळे या प्रकल्पाने येथून गाशा गुंडाळला आणि तो तामीळनाडूमध्ये गेला. तेव्हापासून ही जागा त्या कंपनीच्या ताब्यातच होती. उदय सामंत यांनी उद्योग खात्याने मंत्रिपद स्वीकारल्यानंतर ही जागा परत घेण्याला अधिक गती आली.मात्र कंपनीने त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वाेच्च न्यायालयाने ही जागा उद्योग खात्याकडे हस्तांतरित करण्याचा आदेश दिल्याने तेथे अन्य प्रकल्प आणण्याचा पर्याय खुला झाला आहे. मंत्री सामंत यांनी या ५०० एकरपैकी २०० एकर जागा भारतीय संरक्षण खात्याकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेत संरक्षण खात्याचा शस्त्रांचा कारखाना उभारला जाईल. जागा हस्तांतरणाचा करार १५ दिवसात होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.रोजगाराच्या संधी
- या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील छोट्या मोठ्या उद्योगांना काम मिळण्याची मोठी संधी मिळेल, असे अपेक्षित आहे. जिल्ह्यातच चांगल्या नोकऱ्या तसेच कुशल अकुशल कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
- फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या प्रकल्पाचे स्वागत करत असल्याचे फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र सावंत सांगितले आहे. या प्रकल्पाबाबत एखाद्या संघटना, व्यक्ती किंवा संस्थेची काही शंका किंवा हरकत असेल तर त्याचे निराकरण फेडरेशन करण्यास तयार असल्याचेही त्यांनी कळवले आहे.