रत्नागिरी : आजच्या कोकण दौऱ्यात मी जैतापूरला जाणार नसलो तरी त्याचा कोणीही गैरअर्थ काढू नये. जैतापूर प्रकल्पविरोधी आंदोलन तापलेले असताना आपण अनेकदा तेथे गेलो होतो. त्यामुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पा विरोधातील शिवसेनेची भूमिका ठाम आहे व यापुढेही ती कायम राहील, त्याबाबत कोणीही संशय बाळगण्याचे कारण नाही. जनतेला दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज, शनिवारी मालगुंड (ता. रत्नागिरी) येथे पत्रकारांशी बोलताना दिली. आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात ठाकरे यांनी गणपतीपुळे येथून आज केली. त्यांच्या दोन दिवसांच्या दौरा कार्यक्रमात किनारपट्टीवरील अनेक ठिकाणांचा समावेश असताना वादग्रस्त अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या जैतापूर भेटीचा समावेश नसल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. याबाबत शिवसेनेची भूमिका बदलली काय, असा संशयही निर्माण झाला होता. मात्र, ठाकरे यांनी या चर्चेला पूर्णविराम देत आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले.आज सकाळी १०.३० वाजता ठाकरे यांचे गणपतीपुळे येथे आगमन झाले. त्यानंतर ११ वाजता पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह त्यांनी गणेश दर्शन घेतले. त्यांच्या आगमनानंतर मंदिरात श्रीगणेशाची आरती झाली.कोकण व शिवसेना हे जे नाते जोडले गेलेले आहे, ते कोणीही तोडू शकणार नाही. हा दौरा राजकीय नाही. शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या कोकणवासीयांना राम राम म्हणायला, जय महाराष्ट्र म्हणायला आलोय, अशा गहिवरल्या शब्दात उद्धव ठाकरे यांनी कोकणवासीयांना धन्यवाद दिले. कोकणवासीयांना दिलेला विकासाचा शब्द वाया जाऊ देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जल्लोषी स्वागत रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांचे सर्वत्र जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी रत्नागिरी ते गणपतीपुळे मार्गावर तसेच रत्नागिरी-पाली मार्गावर जागोजागी भगवे झेंडे लावण्यात आले होते. गणपतीपुळेनंतर पुढील नियोजित दौऱ्यासाठी ते पाली, राजापूर, देवगड व मालवणकडे रवाना झाले. ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी जागोजागी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जैतापूर प्रकल्पविरोधी भूमिकेवर सेना ठाम
By admin | Published: November 23, 2014 12:34 AM