आॅनलाईन लोकमतमंडणगड (जि. रत्नागिरी), दि. १३ : पंदेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र्राच्या रुग्णकल्याण समिती अध्यक्षपदावरुन शिवसेना व राष्ट्रवादीत खडाजंगी उडाल्याने येथील राजकीय वर्तुळात सध्या तणावाचे वातातरण आहे. रुग्णकल्याण समिती अध्यक्षपदासाठी लढत असलेल्या या दोन्ही पक्षांना जनतेच्या समस्या आणि हक्कांशी काही देणेघेणे नसल्याचेच दिसून येत आहे.
मंडणगड तालुक्यातील पंदेरी आरोग्य केंद्र हे सध्या भाड्याच्या जागेत सुरू आहे. चार वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली या रुग्णालयाची इमारत रस्ता व पाण्याअभावी आजही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. त्याचबरोबर दोन वर्षे येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. यावर या दोन्ही पक्षांनी कोणताही तोडगा वा पाठपुरावा केलेला नाही. निवडणुकीपूर्वी मोठमोठी आश्वासने देणाऱ्या पुढाऱ्यांना आता स्वत:चे हित दिसत आहे. मात्र, जनतेच्या समस्यांचा त्यांना विसर पडला आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे आठवड्यातून केवळ दोन दिवसच बाह्यरुग्ण विभाग सुरू असतो. या रुग्णालयातील पूर्णवेळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्त आहेत. सध्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चरके या रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. अन्य तेरा पदेही रिक्त आहेत.
या रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे य्समस्या सोडवण्याऐवजी शिवसेना व राष्ट्रवादी हे पक्ष येथील रुग्णकल्याण समितीचा अध्यक्ष कोण असावा, या वादातच अडकून पडले आहेत.