चिपळूण : येथील नगरपरिषदेच्या अखत्यारित असणाऱ्या शहरातील पवन तलाव मैदान येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने खेळाडूंसह शहरवासीयांची मोठी गैरसोय होत आहे. दिवसेंदिवस उकाड्यातही वाढ होऊ लागल्याने नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ त्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.
शहरात पवन तलाव मैदान हे एकमेव खेळाचे मोठे मैदान आहे. या मैदानाच्या डागडुजीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. नगरपालिकेत तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. पिण्याच्या पाण्याचीसुद्धा येथे वानवा आहे. या मैदानावर विविध खेळाच्या खेळाडूंची सराव सत्र घेतली जातात. सकाळ, संध्याकाळी येथे क्रिकेट, कबड्डीचे खेळ खेळले जातात. याशिवाय हिवाळी व उन्हाळी पोलीस व आर्मी भरती प्रशिक्षण, कबड्डी प्रशिक्षण, फुटबॉल, क्रिकेट व इतर खेळांचे प्रशिक्षण होतात. क्रिकेटच्या स्पर्धाही रंगतात. पावसाळा सोडल्यास हे मैदान नेहमीच गजबजलेले असते. मात्र, तरीही या मैदानावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी नगरपालिकेने खेळाडूंकरिता या मैदान परिसरात पाणपोई अथवा पाण्याच्या नळाची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी शहरवासीयांमधून केली जात आहे.