चिपळूण : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. उन्हाच्या तडाख्यामुळे तालुक्यातील काही गावात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांत प्रशासनाने त्वरित टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी सदस्यांनी केली.
सभापती रिया कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. ऑनलाईन सभेला अनेक सदस्य अनुपस्थित राहिले. उपस्थित सदस्यांनी विविध खात्यांचा आढावा घेतला. उन्हाच्या तडाख्यामुळे गेल्या महिन्यापासून टंचाईग्रस्त गावातून टँकरची मागणी केली जात असल्याचे सदस्या पूजा निकम यांच्यासह सदस्यांनी सांगितले. टंचाईग्रस्त गावात पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागते. त्यामुळे टँकरची मागणी केलेल्या गावांत प्रशासनाने पाहणी करून त्वरित टँकर सुरू करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. महिला, बालकल्याण विभागाकडून तालुक्यातील महिलांच्या हाताला काम मिळावे, यासाठी प्रशिक्षण घेतले जाते. मात्र, या प्रशिक्षणाचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना वेळेत मिळत नाही. ते निर्धारित वेळेत उपलब्ध करण्याची सूचना सदस्यांनी केली.
कोंढे येथे एका व्यक्तीने रस्त्याची अडवणूक केलेली आहे. रस्ता मोकळा करण्याची सूचना असतानाही तो केला जात नाही. त्यामुळे प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढून रस्ता मोकळा करण्याची मागणी नितीन ठसाळे यांनी केली. माजी सभापती व विद्यमान सदस्या धनश्री शिंदे यांनी अंगणवाडीतील पोषण आहाराचा मुद्दा मांडला. सदस्या शिंदे म्हणाल्या की, अंगणवाडीतील बालकांचा पोषण आहार मिळालेला नाही. डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यानचा आहार काही ठिकाणी वितरित झालेला नाही. यावर महिला, बालकल्याणचे अधिकारी अरुण जाधव म्हणाले, तालुक्यातील अंगणवाड्यांना शासनाने नेमलेल्या ठेकेदाराकडूनच पोषण आहार दिला जातो. तालुक्यातील काही बीटमध्ये फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोषण आहार देण्यात आला, तर काही ठिकाणी अद्याप वितरित होणे बाकी आहे.
सभेला सभापती रिया कांबळे, गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, सहायक गटविकास अरुण जाधव, सदस्य, विविध खात्यांचे अधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते.