चिपळूण : भगवे फेटे, टोप्या अन् झेंडे, पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला व नागरिक, पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी...जय शिवाजी अशा घोषणा देत चिपळूणवासीयांनी शिवशौर्य यात्रेचे जल्लोषात स्वागत केले. या स्वागतासाठी शहरातील पाग येथील श्री सुकाई देवी देवस्थान, श्री देव जुना कालभैरव देवस्थान, विविध धार्मिक व सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दलातर्फे नियोजित केलेल्या शिवशौर्य यात्रेचे सोमवारी (२ ऑक्टाेबर) सायंकाळी चिपळूण तालुक्यात आगमन झाले. सावर्डे येथे या यात्रेचे स्वागत झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावर या यात्रेचे शहरातील पागनाका येथे आगमन झाले. यावेळी श्रीदेवी सुकाई देवस्थानातर्फे या शिवशौर्य यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.या यात्रेच्या स्वागतासाठी महामार्गालगतच्या प्रवेशद्वारावर तसेच तिथपासून मंदिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने भगव्या फुग्यांची सजावट व भगवे झेंडे लावण्यात आले होते. मंदिर परिसरात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे सदस्य अभय जगताप यांनी उपस्थितांना यात्रेची माहिती दिली. तसेच श्रीदेव जुना कालभैरव देवस्थान येथेही या यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. पागनाका व श्रीदेव जुना कालभैरव देवस्थानतर्फे या शिवशौर्य यात्रेच्या आयोजकांचा सन्मान करण्यात आला.या यात्रेत विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत सहमंत्री अनिरूद्ध भावे, उत्तर रत्नागिरी जिल्हामंत्री उदय चितळे, विहिंपचे कार्यालय प्रमुख प्रमोद पटवर्धन, बजरंग दल संयोजक ॲड. आदित्य भावे यांच्यासह विविध धार्मिक, सामाजिक संस्था, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.
शिवशौर्य यात्रेचे चिपळुणात जल्लोषी स्वागत; ‘जय भवानी..जय शिवाजी’चा घुमला नारा
By संदीप बांद्रे | Published: October 03, 2023 5:11 PM