केळ्ये येथील स्वरूप श्रीहरी देसाई यांनी सिव्हील इंजिनिअरींग पूर्ण केल्यानंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या मागे न लागता शेतीचा निर्णय घेतला. वडिलोपार्जित जागेत लागवडीचा निर्णय घेतला. कोणत्या प्रकारची शेती करावी, याबाबत विचार सुरू असतानाच लिलीच्या फुलांची शेती करण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. चार एकर क्षेत्रावर लिलीची लागवड केली आहे.
पुणे येथील नर्सरीतून लिलीचे कंद आणून लागवड केली. गादी वाफे तयार करून कंद लागवड केली. शेणखतही वापरण्यात आले. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी ठिबक सिंचन व्यवस्था केली आहे. गेली चार वर्षे त्यांनी लिलीची लागवड वाढवित नेली. पावसाळ्यात स्लॅक सिझन असल्याने दोनशे दिवसांत चांगले उत्पादन प्राप्त होते. या काळात ८० हजार जुड्या प्राप्त होत असून, वर्षाला आठ लाखांचे उत्पन्न सहज प्राप्त होते. पीक व्यवस्थापन ते उत्पादन प्राप्त होईपर्यंत पन्नास टक्के खर्च येतो.
लागवडीपासून फुले काढणीपर्यंत त्यांच्याकडे मजुरांचा सतत राबता असतो. १४६० मजुरांना वर्षभर काम मिळत आहे. लिलीच्या शेतीमध्ये त्यांनी चवळी, मटकी, भुईमूगाची लागवड केली असून चांगले उत्पादन त्यांना प्राप्त होत आहे. शहरातील फुलविक्रेत्यांना ते सकाळी स्वत: येऊन मागणीनुसार फुलांच्या जुड्या देत आहेत. प्रती जुडी आठ ते दहा रुपये दर प्राप्त होत असून ४० कळ्यांची जुडी बांधत आहेत. फुले काढणे, जुड्या बांधण्यासाठी स्वरूप यांना पत्नी, आईची साथ लाभत आहे. शेतीतही फायदा असल्याचे सिध्द केले आहे.
मशागतीला प्राधान्य
कोणत्याही प्रकारची शेती करताना, मशागत आवश्यक आहे. त्यामुळे लिलीचे कंद लावल्यानंतर योग्य वेळी खते, कीटकनाशक फवारणी, वाढलेल्या रोपांची ठरावीक वेळी छाटणी करीत असल्याने वर्षभरात उत्पादन सुरू झाले. दररोज फुलांच्या जुड्या बांधून ते शहरातील फुलविक्रेत्यांना विकत आहेत. ४० कळ्यांच्या जुड्या बांधल्या जात आहेत. त्यामुळे फुलविक्रेत्यांना जुड्या देणे सुलभ होत असून व्यवसायात हळूहळू वृध्दी झाली आहे.
गुलाबाची शेती करण्याचा निश्चय
वडिलोपार्जित शेतात ते लिलीबरोबर सेंद्रिय पद्धतीने आंबा उत्पादन घेत आहेत. लिलीच्या शेतात मटकी, चवळी, भूईमुगाचे उत्पादन घेत आहेत. शहरात फुलांना चांगली मागणी होत असल्याने गुलाबाची शेती रिकाम्या प्लॉटमध्ये करण्याचे निश्चित केले आहे. पावसाळ्यात चार महिने फुलांचा व्यवसाय धोक्यात असला तरी उर्वरित आठ महिने चांगला व्यवसाय होतो.
एक वर्षानंतर उत्पन्न
लिलीच्या कंदाची लागवड केल्यानंतर एक वर्षानंतर उत्पन्न सुरू होते. वेळेवर योग्य मशागत असेल तर उत्पन्न चांगले प्राप्त होते. लिलीच्या फुलांना बाजारात चांगली मागणीही आहे.
- चार एकर क्षेत्रावर लिलीची लागवड.
- वर्षभर १४६० मजुरांना झाला रोजगार प्राप्त.
- वार्षिक आठ लाखाचे उत्पन्न पैकी ५० टक्के खर्च.