आवाशी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील कलावंतांना मानधन मिळावे, अशी मागणी खेड तालुका वारकरी संप्रदायातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन खेड तहसीलदारांना देण्यात आले.
कोविडमुळे राज्यातील भजन, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून होणारे समाजप्रबोधनाचे कार्यक्रम बंद असल्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेअंतर्गत संप्रदायिक कीर्तनकार, गायक, मृदंगाचार्य यांना मदत मिळावी, तसेच त्यांच्या नावाची नोंद नसल्यामुळे त्यांची नोंद करण्यात यावी, वारकरी साहित्य परिषदेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडे कलावंतांची यादी सादर करण्यात आली आहे. ही यादी महाराष्ट्र शासनाच्या यंत्रणेला सादर व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हे निवेदन देताना खेड तालुकाध्यक्ष सुरेश चाळके, सचिव गणपत येसरे, सहसचिव महेश गोवळकर, खजिनदार नंदकुमार महाडिक, सभासद दत्ताराम पवार, अरुण पिरंदणकर, विलास मोरे, रवींद्र गोवळकर, रवींद्र तांबिटकर व मंगेश शिंदे उपस्थित होते.