चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालयात शिक्षण घेऊन बाहेर पडलेले काही कलाकार गेले तीन महिने मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी मोकळ्या भिंतींवर विविध चित्रे रेखाटून शहराचे सुशोभीकरण करण्याच्या कामात मग्न आहेत. या चित्रांमुळे मुंबईतील भिंती बाेलक्या झाल्या आहेत.सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालयात ज्येष्ठ चित्रकार आणि शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. महाविद्यालयातून रेखा आणि रंगकलेचे शिक्षण घेऊन बाहेर पडलेले हेमंत सावंत, अमेय कोलते, मयुरेश खळे, प्रशांत आग्रे, किरण खापरे, प्रणित मोहिते, अल्पेश बंडबे, समीर घडशी अंधेरी पूर्व विभाग, मेट्रो कारशेड याठिकाणी भिंतींचे सुशोभीकरणाचे काम करत आहेत. कोकणातील या कलाकारांनी आपल्या कलाविष्कारातून मुंबईच्या सौंदर्यात भर घालत हे नाते अधिक दृढ केले आहे.सलग तीन महिने हे कलाकार आपल्या कलाविष्काराच्या माध्यमातून विविध चित्राकृती रेखाटत अंधेरी पूर्व विभागातील भिंती बोलक्या करत आहेत. एकूण ५० हजार चौरस इंचाचे हे काम प्रत्यक्षात जानेवारी महिन्यात सुरू करण्यात आले असून, मार्चअखेरीस ते पूर्णत्वास जाणार आहे. काही ठिकाणी भिंतीची उंची २५ फुटांपर्यंत असल्याने बांबूच्या पराती बांधून कलाकारांना काम करावे लागले आहे.
‘सह्याद्री’च्या कलाकारांनी मुंबईच्या भिंती केल्या बाेलक्या, सलग तीन महिने रेखाटतायत चित्राकृती
By अरुण आडिवरेकर | Published: March 24, 2023 6:08 PM