दापोली : तालुक्यातील समुद्रकिनारी भरधाव वेगाने गाड्या पळवून स्टंटबाजी करण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे पर्यटकांच्या जिवावर बेतत आहे. रविवारी तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारी दोन, तर पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर एक गाडी वाळूत रुतली होती. गेल्या दोन दिवसांत तब्बल ५ गाड्या वाळूत रुतल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये शनिवारी आंजर्ले आणि कर्दे येथे गाड्या रुतल्या होत्या.गेल्या दोन वर्षांपासून आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर गाड्या पाण्यात बुडण्याच्या घटना घडत आहेत. मात्र, आता तालुक्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर अशा घटना घडू लागल्याने समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसत आहे. शनिवारपासून अमावास्या सुरू झाल्याने समुद्राला मोठ्या प्रमाणात भरती आली हाेती. त्याचा फटका पर्यटकांना बसला. समुद्रकिनाऱ्यावर भरधाव वेगाने गाड्या फिरवून स्टंटबाजी करताना गाड्या वाळूत रुतण्याचे प्रकार गेल्या दाेन दिवसांत घडले आहेत.
तालुक्यातील आंजर्ले आणि कर्दे येथील समुद्रकिनाऱ्यावर चारचाकी गाड्या रुतल्याच्या घटना घडलेल्या असतानाच रविवारी पुन्हा दाेन ठिकाणी तीन गाड्या रुतल्याच्या घटना घडल्या. यामध्ये मुरुड समुद्रकिनारी दाेन, तर पाळंदे येथे एक गाडी वाळूत रुतली होती. या गाड्या स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या.
सुरक्षारक्षकांचेही ऐकत नाहीतपर्यटन हंगाम सुरू झाल्यापासून किनारपट्टीवर या घटना वारंवार होऊ लागल्या आहेत. कर्दे, मुरुड, हर्णै, पाळंदे आणि आंजर्ले किनाऱ्यावर हे प्रमाण अधिक आहे. समुद्रकिनाऱ्यावर गाड्या नेण्यास काेणीही अडवत नसल्याने पर्यटकांचे फावले आहे. मात्र, मुरुड, पाळंदे आणि हर्णै येथे सुरक्षारक्षकांचे पर्यटक ऐकत नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे किनाऱ्यांवर पाेलिस तैनात करण्याची मागणी हाेत आहे.