रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये ५३ लाख ६६ हजार ७५० इतक्या नोंदी तपासण्यात आल्या. त्यापैकी १३० नोंदी कुणबी मराठा व मराठा कुणबी तसेच ४ लाख ६१ हजार ६०० कुणबी नोंदी आढळून आलेल्या आहेत. या नोंदीवरुन जिल्ह्यात तसेच मराठा कुणबी -कुणबी मराठा ११ व्यक्ती व ४ लाख ३ हजार ८४९ कुणबी व्यक्तींना जात प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहेत. मराठा व खुल्या समाजातील नागरिकांचे २३ जानेवारीपासून सर्वेक्षणाचे काम सुरु होणार आहे.मागील ३ महिन्यापासून कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी व कुणबी नोंदीबाबत काम सुरु आहे. शासनाच्या निर्णयानुसार निवृत्त न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या स्वीकृत केलेल्या पहिल्या अहवालाच्या अनुषंगाने महसुली अभिलेखे, जन्ममृत्यू रजिस्टरसंबंधी अभिलेखे (गाव नमुना 14), शैक्षणिक अभिलेखे, कारागृह विभागाचे अभिलेखे, पोलीस विभागाचे अभिलेखे, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडील अभिलेखे, भूमी अभिलेख विभागाचे अभिलेखे, जिल्हा सैनिक विभाग यांच्याकडील अभिलेखे, जिल्हा वक्फ अधिकारी, शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा तपशीलाबाबतची अभिलेखे, जात पडताळणी समितीकडील अभिलेखे इत्यादी अभिलेखाची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. ही अभिलेख तपासणी १० डिसेंबर २०२३ पर्यंत करण्यात आली. त्यानंतर ११ डिसेंबरला या कामकाजाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.महाराष्ट्र शासनाने मराठा व खुल्या समाजातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविले आहे. हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेकडून केले जाणार आहे. जिल्ह्यात सर्वेक्षणासाठी तहसीलदार यांची नोडल अधिकारी, नायब तहसीलदार यांची सहाय्यक नोडल अधिकारी, तसेच तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, शिक्षक इत्यादीच्या पर्यवेक्षक व प्रगणक म्हणून गावनिहाय नियुक्त्या करण्यात आल्या. १०० कुटुंबासाठी १ प्रगणक व प्रत्येकी १५ प्रगणकांसाठी १ पर्यवेक्षक याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या फेरनियुक्त्या करण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यामध्ये अंदाजे ४ लाख २० हजार ९९९ कुटुंबे असून, त्यांच्या सर्वेक्षणासाठी ४ हजार १५५ प्रगणक व २७१ पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे.तालुक्यात ३०० प्रगणकांसाठी १ प्रशिक्षक, ३०० ते ६०० प्रगणकांसाठी २ प्रशिक्षक व ६०० पेक्षा जास्त प्रगणकांसाठी 3 प्रशिक्षक याप्रमाणे प्रशिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यानुसार नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी, तालुकास्तरीय प्रशिक्षक यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल ५३ लाख ४ लाख कुणबी प्रमाणपत्रे वितरीत, उद्यापासून सर्वेक्षण
By शोभना कांबळे | Published: January 22, 2024 7:03 PM