रत्नागिरी : हवामानात सतत होणाऱ्या बदलांमुळे बागायतदार हैराण झाले आहेत. या बदलांमुळे पिकाच्या विशेषत: आंब्याच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहे. सध्या ९० टक्के झाडांना पालवी आली आहे. त्यामुळे मोहर प्रक्रिया उशिराने होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दोन दिवसांच्या ढगाळ हवामानामुळे तुडतुड्यांचा तसेच काही ठिकाणी थ्रीप्सचाही प्रादुर्भाव दिसत आहे. त्यामुळे पालवीवर कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे.पावसाचा मुक्काम यावर्षी दिवाळीपर्यंत होता. त्यामुळे ९० टक्के झाडांना पालवी आली असून, केवळ दहा टक्के झाडे मोहराकडे वर्ग होत आहेत. दिवसा ऊन व रात्री थंडी, पहाटेचे धुके हे हवामान आंबा पिकासाठी पोषक होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला आहे. हवामान खात्याने तर पावसाचा इशारा दिला होता. ढगाळ हवामानामुळे पालवीवर तुडतुडा, थ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी करून दोन्ही कीडरोग नियंत्रणास आणण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पालवी असलेल्या झाडांवर कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे.उत्पादनावर परिणामतुडतुडा नियंत्रणात न आणल्यास पालवीवर तुडतुड्याची विष्ठा साचून काळे डाग राहतात. त्यामुळे पानांद्वारे कार्बनडाय ऑक्साईड वायू शोषून घेणे व ऑक्सिजन बाहेर सोडणे या प्रक्रियेवर परिणाम होतो. पानांवर काळे डाग चिकटून राहिल्याने मोहोर तयार होण्याच्या प्रक्रियेत समस्या निर्माण होते. शिवाय उत्पादनावरही परिणाम होतो. चांगले उत्पादन मिळण्यासाठी पालवीवरील तुडतुडा, थ्रीप्स नियंत्रणात आणणे आवश्यक आहे.रोग थांबायला हवेतसध्याची पालवी जून होऊन मोहोर येण्यासाठी जानेवारीचा मध्य किंवा फेब्रुवारी उजाडण्याची शक्यता आहे, तरच आंबा मार्चअखेर किंवा एप्रिलमध्ये बाजारात येऊ शकतो. फळप्रक्रिया सुरळीत व हमखास होण्यासाठी झाडांचे कीडरोगांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे. तुडतुडा, थ्रीप्सपाठोपाठ काही ठिकाणी उंटअळीचा प्रादुर्भाव होण्याचीही भीती आहे. हवामानातील बदलाचा अंदाज घेत आंबा पिकासाठी योग्य कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे.सुरुवात होतानाच थंडी गोठलीऑक्टोबरपर्यंत पाऊस पडत असल्याने ऑक्टोबर हीट जाणवली नाही. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये पाऊस पडल्याने पहिल्या टप्प्यातील मोहराचे नुकसान झाले होते. यावर्षी दिवाळीनंतर पाऊस पडला नाही. थंडीनेही चांगली सुरुवात केली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून थंडी ओसरली असून, उकाडा वाढला आहे. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. ढगाळ हवामान कीडरोगाला पोषक असल्याने बागायतदारांमध्ये साशंकतेचे वातावरण आहे.
दिवाळीपासूनचे हवामान आंबा पिकासाठी पोषक होते. सर्वत्र पालवी आली असून, केवळ दहा टक्के झाडांना मोहर आहे. गेल्या दोन-चार दिवसांतील ढगाळ हवामानामुळे पालवीवर कीडरोगाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. वेळीच कीटकनाशक फवारणी करून कीडरोग नियंत्रणात आणणे गरजेचे आहे, अन्यथा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. - राजन कदम, बागायतदार